विरळे चे पोष्टमन शंकर कांबळे यांचा हृदय विकाराने मृत्यू
आंबा प्रतिनिधी ( प्रकाश पाटील ) : विरळे तालुका शाहुवाडी येथील शंकर पांडुरंग कांबळे ( वय ६४ वर्षे ) यांचा शनिवार दि.८ जुलै रोजी सायंकाळी शेताकडून घरी येत असताना, पाऊस सुरु झाला. दरम्यान वाटेतील ओढ्याचे पाणी वाढले. यामुळे ओढा ओलांडत असताना, त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने, ते पाण्यात पडले, व त्यांचा बुडून मृत्यू झाला. अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दि.९ जुलै रोजी रोप लावण करण्याचे नियोजन शंकर कांबळे यांनी केले होते. त्यासाठीच ते शनिवार दि.८ जुलै रोजी शेतात पाणी लावण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान पावसाच्या जोरदार सारी बरसू लागल्या. घरी परत येत असताना, ओढ्याचे पाणी अचानक वाढले. ओढा ओलांडत असताना, नेमका त्याच वेळेस त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला. त्यामुळे ते ओढ्यात पडले. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेले. रात्री उशिरा पर्यंत ते घरी परत आले नाहीत. म्हणून घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.
रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण रुग्णालय मलकापूर इथं त्यांचे शव विच्छेदन करण्यात आले, व त्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

शंकर कांबळे हे विरळे इथं पोष्टमन म्हणून कार्यरत होते. पुढील तीन महिन्यानंतर ते सेवा निवृत्त होणार होते. ते स्वभावाने मनमिळावू असल्याने गावातील लहानांपासून थोरापर्यंत त्यांचे सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

त्यांच्या मृत्यू ची बातमी समजताच विरळे पंचक्रोशीत शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.