शिरगाव इथं वद्युत तारेच्या स्पर्शाने गाभण म्हैशीचा मृत्यू
आंबा प्रतिनिधी ( प्रकाश पाटील ) : शिरगाव तालुका शाहुवाडी येथील सुनील बळीराम गिरी यांच्या म्हैशीला तुटून पडलेल्या प्रवाहित विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दहा महिन्याच्या गाभण म्हैशीचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर ची घटना शुक्रवार दि.७ जुलै रोजी शिरगाव इथं घडली असून, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर मुक्या जनावराला प्राणास मुकावे लागले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर हकीकत अशी कि, शिरगाव येथील सुनील बळीराम गिरी हे आपल्या तीन म्हैशी घेवून चारावयास तसेच पाणी पाजण्यास सटवाई चा ओढा याठिकाणी गेले होते. दरम्यान ओढ्यानाजिक या अगोदरच वीजवाहक तार तुटून पडली होती. यावेळी ओढ्याकडे पाणी पिण्यासाठी म्हैशी जावू लागल्या. दरम्यान तुटून पडलेल्या या वीजवाहक तारेला म्हैशी चा स्पर्श झाल्याने म्हैस विजेचा धक्का लागून जाग्यावरच मृत पावली.

सदर च्या घटनेची माहिती मिळताच येथील वायरमन गणेश पाटील व सुनील घरे यांनी घटनास्थळी येवून, विद्युतप्रवाह बंद केला.
सदर घटनेचा पंचनामा पोलीस पाटील प्रकाश पोतदार यांच्यासमक्ष करण्यात आला.

दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई मिळावी, तसेच या हलगर्जीपणाबद्दल संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.