साडेचार हजार लोकांना व्यसनमुक्त करणाऱ्या साधना पाटील प्रशंसनीय
शिराळा प्रतिनिधी(संतोष बांदिवडेकर) : घोटभर दारू संसार जाळते. चिमूटभर तंबाखू कर्करोगाला निमंत्रण देते. एकदा का माणूस व्यसनाच्या आहारी गेला कि, त्याला त्या जाळ्यातून बाहेर काढणे सोप्प नसते. हे काम साधना पाटील नावाची एक महिला करते आहे.

.शिराळा येथे यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी तब्बल साडेचार हजार लोकांना व्यसनमुक्त केले आहे. हे गेली आठ वर्षे त्यांनी झटून साडेचार हजार संसार वाचवले आहेत. साधना पाटील या इंग्रजी व मानसशास्त्र विषयाच्या दुहेरी पदवीधर आणि एम ए बी एड आहेत. त्यांनी स्कूल मॅनेजमेंट डिप्लोमा केला आहे .पती डॉक्टर राजाराम पाटील यांचे शिराळा येथे रुग्णालय आहे .तेथेच त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राचा निर्धार केला .

अनेक महिला रुग्ण डॉक्टरांकडे गरिबीचे आणि त्याला कारण ठरलेल्या व्यसनांची गाऱ्हाणे घालायच्या. व्यसनी नवरा जगू देईना, असे सांगायचे. त्यातूनही ठिणगी पडली, सखी मंच व्यासपीठाच्या अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी हा प्रश्न समजून घेतला होता. एक महिला म्हणून त्यांच्या मनात काहूर माजले होते. व्यसनमुक्तीचा निर्धार करून त्यांनी काम सुरू केले. रुग्णालयात येणाऱ्या महिलांशी त्या व्यसनमुक्ती बाबत चर्चा करू लागल्या. तुमच्या मनात जिद्द असेल, कुटुंबाच सहकार्य असेल, तर तुमच्या नवऱ्याची नशा यात्रा आपण थांबवू असा विश्वास त्यांनी महिलांना दिला.

त्या नवऱ्याला घेऊन समुपदेशनासाठी यायला लागल्या. आत्तापर्यंत ६ हजार जणांना त्यांनी समुपदेशन केले आहे. त्यापैकी साडेचार हजार लोक व्यसनमुक्त झाले आहेत. त्या म्हणाल्या व्यसनमुक्त मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक पिढ्या बरबाद होताना बघत बसणे योग्य नाही. आपण काम केले पाहिजे २० ते ३० वयोगटातील मुले वाया जात आहेत. त्यांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मी धडपड करत आहे.