पारधी समाजासाठी आजपासून बेमुदत ” पाल ठोक ” आंदोलन – सुधाकर वायदंडे
शिराळा प्रतिनिधी :(संतोष बांदिवडेकर )आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे, या व पारधी समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर सोमवार पासून बेमुदत ‘पाल ठोक’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते सुधाकर वायदंडे यांनी दिली.

यावेळी सुधाकर वायदंडे म्हणाले कि, दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे यांचे नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाच्या विविध मागण्यांबाबत २००१ सालापासून निवेदने,मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र लढा चालू आहे.

पारधी समाजाला मुख्य प्रवाहात घेण्यासाठी शासन स्तरावर अनेक घोषणा होऊन, तसे शासन निर्णय झालेले आहेत. परंतु त्या योजनांची ठोस अंमलबजावणी झालेले दिसून येत नाही. त्यामुळे पारधी समाज अजूनही सर्व योजनांपासून वंचित राहिलेला आहे. आश्वासने देऊन प्रशासनांने वारंवार फक्त वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या याच उदासीनतेमुळे शिराळा,-वाळवा तालुक्यातील पारधी समाजाचे पुनर्वसन रखडलेले आहे.

‘ एक गांव एक पारधी कुटुंब ‘ या योजने प्रमाणे काही लोकांना गांव मिळाले. परंतु घरकुलासह अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. जे लोक घरकुल लाभासाठी पात्र आहेत, अशा लोकांना ग्रामपंचायतीने जागा मोजून न दिल्यामुळे घरकुलाचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच अजून ज्या लोकांना गांव मिळालेले नाही, त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे.

अनेक वेळा अधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा संबंधित गावचे सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच हे गावातील लोक ऐकत नाही, म्हणत कोणताही ठोस प्रतिसाद न देता वेळ मारून नेतात.

काही गावामधून पारध्यांना हाकलून देण्याचे प्रकार घडत आहेत. याची दखल घेऊन पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पुनर्वसनाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
म्हणून पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे, या व अन्य मागण्यासाठी सोमवार पासून इस्लामपूर प्रांत कार्यालसमोर बेमुदत ‘ पाल ठोक ‘ आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यांची पूर्तता न झालेस, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.

यावेळी दिनकर नांगरे, गंगाराम तांबीरे, टारझन पवार, इंद्रजित काळे, राकेश काळे, रोशना पवार, गुलछडी काळे, सुनिल काळे यांच्यासह पारधी बांधव उपस्थित होते.