शिराळ्यात मुसळधार पाऊस : चांदोली धरण ५० टक्के भरले : गत वर्षीच्या तुलनेत २५ टक्के पाणी साठा कमीच
शिराळा प्रतिनिधी:( संतोष बांदिवडेकर )
शिराळा तालुक्यासह चांदोली परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या २४ तासात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे. या पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तीन आठवड्या पासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती, मात्र पुन्हा पावसाला चांगली सुरुवात झाली आहे.

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, चांदोली धरण परिसरात पावसाची संतधार कायम सुरु आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता धरण ५० टक्के भरल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता पर्यंत पाणलोट क्षेत्रात ४८८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संततधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्यामुळे २४ तासात १ मीटरने धरणाची पाणी पातळी वाढत आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात १३,८३१ क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे.

मागील पाच ते सहा दिवसापासून चांदोली धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने, आज चांदोली धरण यावर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात, आज पर्यंत १७.२० टीएमसी पाणी साठा झाला असून, धरणाची पाणी पातळी ६०६.३० मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणातून ४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे. चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणी नुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे वारणा धरण पूर्ण भरण्याकडे नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे. निर्धारित क्षमते पर्यंत पाणीसाठा झाल्या नंतरच वारणा नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सोमवार पासून दमदार हजेरी लावल्याने, मंगळवार सकाळ पासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने, पाणीसाठ्यात वाढ झाली असुन, परिसरातील ओढे, नाले तसेच वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. परीसरात कमालीचा गारवा पसरला असुन, शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे.

गत वर्षीच्या तुलनेत धरणात २५ टक्के पाणी साठा कमी :
गत वर्षी १९ जुलै २०२२ रोजी धरण ७५ टक्के भरले होते. त्या वेळी सरासरी एकूण पाऊस १२६२ मिलीमीटर पडला होता, तर नदी पात्रात धरणातुन १८३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यावेळी पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक १०,६९५ क्युसेक्स होती.