“आयुष्यातील ध्येय, जिद्दीने आणि कष्टाने आत्मसात करा”: ॲड.भगतसिंग नाईक (नाना)
शिराळा प्रतिनिधी : तुमच्या आयुष्यातील ध्येय ठरवा आणि ते जिद्दीने व कष्टाने आत्मसात करा, हे करत असताना तुमच्या आवडी-निवडी, तुमचे छंद जोपासा, असा सल्ला प.पू. स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष ॲड. मा. भगतसिंग नाईक (नाना) यांनी व्यक्त केले.

संस्थेच्या विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा येथे माजी आमदार स्व. वसंतराव नाईक (बाबा) यांची ३३ वी पुण्यतिथी व नवनियुक्त प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांच्या ‘फॅकल्टी इंडक्शन व स्वागत समारंभ’ कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते.

ॲड. भगतसिंग नाईक (नाना) पुढं म्हणाले की, स्व. बाबांनी अथक परिश्रम घेऊन, या संस्थेची उभारणी केली आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्यां प्रत्येक घटकांनी संस्थेचे उद्दिष्ट, दृष्टिकोन व प्रगती डोळ्यासमोर ठेऊन प्रामाणिक काम करावे.

यावेळी संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक (दादा) यांनीही नविन प्राध्यापकांचे शिक्षण संकुलात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उपाध्यक्ष मा.पृथ्वीसिंग नाईक (बाबा) यांनी प्राध्यापकांना संस्थेचा विस्तार आणि त्याची काम करण्याची पद्धत समजावून सांगितली. प्राध्यापकांच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमांना संस्थेचा पाठींबा असेल, असे सांगून एक कुटुंब बनून काम करण्याचे आवाहन केले. तसेच टिमवर्क चे महत्व अधोरेखित केले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे व प्राचार्या डॉ. उज्वला पाटील यांनी प्रशासक या नात्याने सर्व प्राध्यापकांना त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांगून, नैतिकता, बांधिलकी, विश्वासार्हता, गतीमानता या गुणांचे अवलंबन दैनंदिन कामात करण्याचा सल्ला दिला. प्रा.डॉ. दिलावर जमादार व प्रा. राजसिंह पाटील यांची प्रेरणादायी भाषणे झाली. यावेळी संस्थेत रुजू झालेल्या २२ प्राध्यापकांचा व प्रशासकीय सेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांची ओळखपर मनोगते झाली. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा. राजसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

स्व. बाबांच्या समाधीवर तसेच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. तानाजी हवालदार यांनी केले, आभारप्रदर्शन उपप्राचार्य श्री. बी. आर. बी. दशवंत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजकुमार कदम यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री जगन्नाथ बाऊचकर, दिपक गायकवाड, प्राध्यापक व कर्मचारी हे उपस्थित होते. डॉ. संदीप देशमुख व दीपक हिवराळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.