…अन्यथा बांबवडे इथं उग्र आंदोलन होणार – लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं कोल्हापूर – मलकापूर महामार्गावर पेट्रोल पंप जवळ नेहमीच पाणी साचते. यामुळे इथं अनेक अपघात होत आहेत. याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूला कायम स्वरूपी गटर्स बांधून, होणारे अपघात टाळावे, अन्यथा उग्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल, अशा आशयाचा इशारा बांबवडे येथील लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
ते पुढे म्हणाले कि, सदर च्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात अनेक वेळा होत आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी वित्तहानी बऱ्याचवेळा झाली आहे. रस्याच्या दक्षिणेकडील बाजूला कायमस्वरूपी गटर्स बांधल्यास हि समस्या कायमची संपून जाईल. परंतु या गोष्टीकडे २०१० सालापासून महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. परंतु याकडे हे खाते मात्र तितक्या आस्थेने पहात नाही. त्यामुळे प्रति वर्षी पावसाळ्यात इथं पाणी साचते. आणि अपघातांना निमंत्रण दिले जात आहे.
सदरबाबत शाहुवाडी चे तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. परंतु सदरचे खाते तात्पुरती मलमपट्टी करते, आणि मूळ कामाला बगल दिली जाते. परंतु इथून पुढे पंधरा दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही सरपंच भगतसिंग चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.