करंजफेण येथील एसटी व दुचाकी अपघातात परिचारिका जागीच ठार
बांबवडे : करंजफेण तालुका शाहुवाडी येथील गौळवाडा वळणावर एसटी बसने एका दुचाकी ला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील परिचारिका सौ. स्वरूपा शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तशा आशयाची फिर्याद हैबती शिवराम मगदूम वय ५० वर्षे रा. पुनाळ, तालुका पन्हाळा जि. कोल्हापूर यांनी पोलिसात दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून तसेच घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडे अकरा वाजनेच्या दरम्यान सौ. स्वरूपा विजय शिंदे या करंजफेण पैकी माळापुडे प्राथमिक उपकेंद्र तालुका शाहुवाडी इथं आपले सहकारी हैबती मगदूम यांच्या दुचाकी वरून नांदारी हून करंजफेण पैकी माळापुडे येथील आरोग्य केंद्रात एका गरोदर महिलेच्या तपासणी साठी निघाल्या होत्या. दरम्यान करंजफेण पैकी गौळवाडा येथील वळणावर एसटी क्र. MH 06- S- 3953 ने दुचाकी ला एका बाजूने धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही खाली पडले. दरम्यान सौ. स्वरूपा विजय शिंदे या दुर्दैवाने बस च्या चाकाखाली आल्या. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. एसटी चालक सागर नारायण पाटील रहाणार उत्रे तालुका पन्हाळा जि.कोल्हापूर असे त्यांचे नाव आहे.