२ ऑक्टोबर रोजी ” अथणी शुगर्स ” वर स्वाभिमानी च्या वतीने ढोल-ताशा आंदोलन
बांबवडे : सोमवार दि.२ ऑक्टोबर रोजी अथणी शुगर्स लि. बांबवडे-सोनवडे तालुका शाहुवाडी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सौरभ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ” ढोल बजावो ” आंदोलन करण्यात येणार आहे. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हफ्ता ४००/-रु. मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी दिली.
दरम्यान १३ सप्टेंबर रोजी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तेंव्हा २ ऑक्टोबर पर्यंत दुसरा हफ्ता शेतकऱ्यांना ४००/-रु. प्रती टन मिळावा, याची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.
शाहुवाडी तालुक्यात देखील हीच परिस्थिती आहे. यासाठी साखर कारखान्यातील मंडळींना जागे करण्यासाठी ढोल बजावो आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर केले आहे. बांबवडे येथील पिशवी रोड पासून हा मोर्चा सुरु होवून, तो कारखाना कार्यस्थळावर नेण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात साखरेला व उप पदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यंना यामधून चांगल्या पद्धतीने नफा मिळालेला आहे. वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तोंडावर दसरा, दिवाळी सण आल्याने ऊस उत्पादकांकडे, शेतकऱ्यांच्या कडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हफ्ता ४००/- रु. खात्यावर जमा करण्यात यावे.
सदर दुसरा हफ्ता २ ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास २ ऑक्टोबर नंतर कारखान्याची साखर अडवून ढोल-ताशा आंदोलन करण्यात येईल. यानुसार आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा हफ्ता जमा न झाल्यामुळे उद्या ढोल-ताशा आंदोलन करण्यात येणार आहे.