करंजाई धरणाचे अतिरिक्त पाणी ‘ वाळवा’ ला द्या- रणधीर नाईक
शिराळा /प्रतिनिधी;
वाकुर्डे बुद्रुक येथील करंजाई धरणातून पावसाचे अतिरिक्त पाणी वाकुर्डे योजनेच्या बंद पाईप मधून वाळवा तालुक्यातील लघु, मध्यम प्रकल्प व पाझर तलावामध्ये सोडण्यात यावे अशी मागणी कार्यकारी अभियंता वारणा डावा कालवा क्रमांक १- इस्लामपूर यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिली.
शिराळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत असून करंजाई धरण, अंतरी बुद्रुक धरण व शिराळा येथील मोरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. वाकुर्डे योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये येणाऱ्या शिराळा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये व वाळवा तालुक्यात अजूनही पावसाची परिस्थिती चांगली नाही. या परिसरामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने येथील सर्व लघु, मध्यम प्रकल्प व पाझर तलावामध्ये अतिशय अपुरा पाणीसाठा दिसून येत आहे. या विभागामध्ये पुढील काळात पुरेसा पाऊस पडला नाही, तर येथील शेतकरी पूर्णपणे अडचणीत येणार आहे . करंजाई धरणातून पावसाचे अतिरिक्त होत असलेले पाणी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईन मधून वाळवा तालुक्यातील रेठरे धरण, शिवपुरी, कार्वे, ढगेवाडी, जाक्राईवाडी, वशी , सुरूल ओझर्डे या गावातील लघु, व मद्यम प्रकल्प व पाझर तलावामध्ये सोडले, तर त्या ठिकाणची हजारो एकर शेती वाचणार असून शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाळवा तालुक्यात अजूनही पावसाची परिस्थिती चांगली नसून शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे . मोरणा ,मानकरवाडी व करंजाई धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, अतिरिक्त पडणारे पावसाचे पाणी हे धरणाच्या सांडव्यामधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वाकुर्डे जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पूर्व भागातील पाझर तलाव व मध्यम प्रकल्प भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वाकुर्डे योजनेचे पंप चालू न करता नैसर्गिक पद्धतीने हे पाणी वाळवा तालुक्यामध्ये देणे शक्य असल्याने विना खर्चाचे येथील तलावामध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकतो.