educationalसामाजिक

‘…आणि मायलेकरांनी पुन्हा एकदा कंबर कसली ‘

सरूड : सरूड तालुका शाहुवाडी येथील योगिता पंडित कुंभार या मुलीने दहावी शालांत परीक्षेत ८३.४० % गुण मिळविलेले लख्ख यश, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या आपल्या मातेला समर्पित केले आहे.
येथील ‘इंदिरा गांधी हायस्कूल ‘ ची विद्यार्थिनी असलेल्या योगीताची आई सुनिता पंडित कुंभार या गावातीलच वीटभट्टीवर उन्हाळाभर आळेकरी म्हणून मोलमजुरी करतात. पावसाळ्यात रोजंदारीचा सिलसिला कायम ठेवताना , ही माता सधन शेतकऱ्यांच्या शेतात इतर महिलांच्या सोबतीने भांगलन काम करतात. सरूड इथं कुंभार वस्तीत दहा बाय बारा आकारमानाचे छोटे खापरांचे घर आहे. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे चार वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेले. डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर डोळ्यासमोर थैमान घालत असताना तरुणपणीच आलेलं वैधव्य. एकंदरीत उत्पन्नाचे कोणतेही साधन हातात नसताना सुनिता यांना पदरात स्वप्नील आणि योगिता हि दोन मुले असल्याने जगण्याची लढाई आपल्यालाच लढावी लागणार, याची जाणीव झालेली होती. वडिलांचे छत्र हरपले, त्यावेळी बारावी उत्तीर्ण झालेला स्वप्नील वेळेचा चांगुलपणा म्हणून येथीलच शाहू सुविधा केंद्रामध्ये पूर्णवेळ कामाला जावू लागला, आणि संकटांच्या गर्तेत सापडलेल्या कुटुंबाला आशेचा कवडसा दिसू लागला. हे काम करता करता स्वप्नील स्वतः कला शाखेचा पदवीधर झाला. बहिण योगीताच्या शिक्षणाची बऱ्यापैकी जबाबदारी पेलू लागला. बहिणीलाही भावाच्या आधाराचे मानसिक बळ मिळाले. अभ्यासातील एकाग्रतेसाठी योगीताने त्याचा फायदा घेत, दहावीच्या परीक्षेत ८३.४० % गुणांनी घवघवीत यश संपादन केले. आजोळी इचलकरंजी येथील नातेवाईकांसह अपवाद वगळता अन्य समाज घटकांचा म्हणावा तसा आधार मिळाला नसतानाही, लहान वयातच भावाने उचललेली नकळत जबाबदारी योगीताच्या यशाला आणि आईच्या काबाडकष्टाला विशेष झालर लावून गेली आहे. आता बारावी विज्ञान शाखेतून घवघवीत यश मिळविण्यासाठी योगीताने लक्ष केंद्रित करावे, या माफक अपेक्षेने श्रीमती सुनिता आणि स्वप्नील या मायलेकरांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्याच्या पलीकडे अद्याप तरी काही उद्दिष्ट ठरविलेले नसल्याचे योगीतासह तिच्या या दोन पालकांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!