तळसंदे जवळ पिक-अप टेम्पो व मोटरसायकल अपघातात १ ठार ३ जखमी

नवे पारगाव : वाठार-वारणानगर राज्य मार्गावरील तळसंदे गावच्या वळणावर वडगावहुन कोडोलीकडे भरधाव येणा-या महिंद्रा पिक-अप टेंपोने दोन मोटरसायकलस्वाराना समोरासमोर धडक झाली. या भिषण अपघातात अरबाज दस्तगीर मुजावर (वय २०) हा महाविद्यालयीन तरूण जागीच ठार झाला, तर त्याच्या मागे बसलेल्या अजय संजय खोत आणि त्यांच्या मागुन येणा-या दुस-या मोटरसायकल वरील विक्रम पांडुरंग दाभाडे व मालन ख॔डु नाईक हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील जखमी महीला अतिगंभीर असुन त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांवर नवे पारगाव येथील महात्मा गांधी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडला असुन वडगाव पोलीसांत घटनेची नोंद झाली आहे.
सदर अपघाताबाबत घटनास्थळ व वडगाव पोलीसांतुन मिळालेली माहिती अशी की, अपघातातील मयत अरबाज मुजावर (वय २०) आणि अजय खोत (वय २०,दोघेही रा.मांगले,जि.सांगली) हे दोघेजण वाठार येथील अशोकराव माने इन्स्टिट्यूशन्स मधील शैक्षणिक प्रवेशासंदर्भात मांगले येथून वाठारकडे आपल्या ड्रिमयुगा होंडा मोटरसायकल (क्र.एमएच-०९-डीयु २०८५) वरून जात होते, तर त्यांच्याच मागोमाग बजाज डिस्कवर मोटरसायकल (क्र.एमएच-०९-एयु-२९८२) वरून विक्रम दाभाडे (वय ४९,रा.कोडोली) हे मालन नाईक (वय ४५,रा.जाखले) याना घेऊन वाठारच्या दिशेने जात होते. पाराशरनगर पारगाव येथील स्टार-शिवनेरी हॉटेल समोर तळसंदे गावच्या वळणावर हे सर्वजण आले असतानाच, समोरून वडगावहुन कोडोलीकडे भरधाव आलेल्या महिंद्रा पिक-अप टेंपोने (क्र.एमएच-१०-एसी-१४३) उजवीकडे येत समोरून या दोन्ही मोटरसायकल स्वाराना जोरदार धडक दिली. अरबाज दस्तगीर हा मोटरसायकल वरून नियंत्रण सुटून खाली जोरात आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने म.गांधी रुग्णालयात उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहिर केले. तर त्याच्या मागील अजय खोत याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर मागोमाग असणा-या मोटरसायकल वरील विक्रम दाभाडे यांच्य डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर मालन नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना कोल्हापूर येथील सीपीआरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील टेंपोचालक घटनेनंतर पसार झाला होता.
नवे पारगाव येथील ग्रामीण रूग्णालयात यातील मयत अरबाज मुजावर याचे शवविच्छेदन डॉ.बी.एस.लाटवडेकर यांनी केले.शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईक॔च्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार बालाजी घोळवे,पो.कॉ.रणवीर जाधव करीत आहेत.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!