राजकीयसामाजिक

शाहुवाडी मतदार संघाला झुकतं माप देणार-नाम. शंभूराजे देसाई

भेडसगाव : जेंव्हा सगळ्या जगाचं जिवन ठप्प झालं, अशा काळात ठाकरे सरकारने सर्वसामान्य जनतेला तीन महिने अन्नधान्य आणि आरोग्य सुविधा मोफत पोहोचविल्या. अशा शासनाकडून आपल्या शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघासाठी विकासाचे प्रस्ताव आणा, आपण ते मंजूर करण्याचे यशस्वी प्रयत्न करू. डोंगर भागाच्या या मतदारसंघात आरोग्य सभापतींनी आरोग्यासाठी ३९ रुग्णवाहिका जिल्ह्यात आणल्या, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे मत प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.


भेडसगाव तालुका शाहुवाडी इथं विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याचे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांनी कोरोना काळात रात्रीचा दिवस करून सर्व सामान्य जनतेसाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्याच भेडसगाव मध्ये भेडसगाव आरोग्यवर्धिनी इमारतीचा लोकार्पण सोहळा नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. याचबरोबर भेडसगाव ग्रामपंचायत डिजिटल करण्यात आली. यासाठी अॅप्लीकेशन बनविण्यात आले. त्याचबरोबर येथील प्राथमिक विद्यामंदिर इमारत सुद्धा नव्याने निर्माण करण्यात आली असून,आधुनिकतेकडे त्यांची प्रगती सुरु आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते बाबासाहेब पाटील सरुडकर दादा होते.


यावेळी नाम.देसाई पुढे म्हणाले कि, बांधकाम व आरोग्य सभापतींनी बांधकामाकडे कमी लक्ष देवून, ज्यावेळी खऱ्या अर्थाने आरोग्याची गरज होती, त्यावेळी आरोग्य सभापती होण्याचे खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावले आहे. कोरोना काळात शाहुवाडी तालुक्याला त्यांनी सावरलं. या काळात ठाकरे सरकारने मोठ्या धाडसाने या संकटाला तोंड दिले. आजपर्यंत सगळा निधी थांबविण्यात आला असताना, महाराष्ट्र शासन पुन्हा एकदा साडे सोळा टक्के निधी वगळता, सगळा निधी पुन्हा विकासकामांना देणार आहे. यामुळे जनतेच्या विकासाची इतर कामे मार्गी लागतील. तुमचे आबा खऱ्या अर्थाने जनतेची काळजी करतात,कारण ते सातत्याने जनतेमध्येच असतात. दुर्दैवाने झालेल्या या पराभवाचं वाईट वाटून घेवू नका, कारण तुमचे आबा रात्री दहा वाजेपर्यंत मंत्री आणि अधिकारी यांच्या सोबत त्यांनी उचललेल्या प्रश्नांसाठी चर्चा करीत असताना,आम्ही पाहिले आहे. आपल्या तालुक्यातील पोलीस क्वार्टर ची मागणी लवकरच पूर्ण होईल. आणि शाहुवाडी मतदारसंघाला झुकतं माप दिले जाईल. असेही नामदार शंभूराजे देसाई यांनी सांगितले.


यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर म्हणाले कि, भेडसगाव आरोग्य केंद्राची इमारत एवढी देखणी आहे कि, यामुळे तालुक्याच्या नावलौकिकात भर पडेल. जिल्ह्याला ३९ रुग्णवाहिका पोहचवून बापूंनी हा सरुडकरांचा पठ्ठ्या आहे, हे दाखवून दिलं आहे. आपला झालेला पराभव लक्षात ठेवून कार्यकर्ता एवढा राबला कि, या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या हिमतीने भगवा फडकवला आहे.


यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले कि, शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यात पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सुमारे ८५ कोटी ४० लाख एवढा निधी येत आहे. येथील विविध गावांसाठी सुमारे १२४ कि.मी. चा रस्ता तयार करण्यात येणार आहे. भेडसगाव गावाला त्यागाची आणि इतिहासाची परंपरा आहे. हि परंपरा येथील युवा सरपंच अमरसिंह पाटील यांनी पुढे चालविली आहे. त्यांनी आपल्या मानधनाच्या रकमेतून नव्याने येवू घातलेल्या मुलींच्या भविष्यासाठी ठेव पावत्या करून त्यागाची परंपरा राखली आहे. कारण या गावाच्या पाटलांच्या सुनेने गावाला पाणी मिळावं म्हणून बलिदान दिले आणि भवानी तलावाला पाण्याचा पाझर फुटला. हि त्यागाची परंपरा अशीच पुढे चालू राहील, हि अपेक्षा. भेडसगाव सारखी आरोग्यवर्धिनी अवघ्या कोल्हापुरात नाही. म्हणूनच येथील आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांनी आपल्या नावाला शोभेल,अशीच कामगिरी केली आहे.


यावेळी जिल्ह्याचे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील म्हणाले कि, कोरोना काळात रात्रंदिवस राबताना थकवा कधी जाणवलाच नाही. कारण माझ्या तालुक्यातील,जिल्ह्यातील जनता मरणाच्या दाढेत होती,आणि मदतीसाठी मला हाक मारीत होती,अशावेळी जनकल्याण सर्वात अगोदर ठरवून,केवळ नावापुरती झोप आणि जेवण हा कार्यक्रम ठरवला आणि जनतेला वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. माझ्या सार्वजनिक जिवनाची सुरुवात १९८८ पासून झाली .सुरुवातीपासून मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीची आठवण ठेवून पदांना योग्य न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शाहुवाडी तालुक्यासह जिल्ह्याची मी काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.


यावेळी भेडसगाव चे सरपंच अमरसिंह पाटील यांनी भेडसगाव मध्ये केलेल्या समाजोपयोगी कामांचा आलेख जनतेसमोर मांडला,आणि सरपंच कसे असावे,याचे उदाहरण लोकांसमोर ठेवले.
यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी कार्यक्रमासाठी एन.डी.पाटील सावेकर, जालिंदर पाटील, प्रकाश पोतदार, विनायक कुंभार, शाहुवाडी पंचायत समिती चे नूतन सभापती विजयराव खोत, उपसभापती दिलीपराव पाटील, पं.स.सदस्य सौ स्नेहा जाधव, लतादेवी पाटील, अश्विनी पाटील, माजी जि.प. सदस्य लक्ष्मीताई पाटील, अमरसिंह पाटील कडवेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पोवार, योगेश कुलकर्णी, विष्णू कारंडे, सरूड च्या सरपंच सौ. राजकुंवर पाटील, सुरेश पारळे, भीमराव पाटील सोंडोली, शिवसेनेचे शाहुवाडी तालुका संपर्क प्रमुख आनंदराव भेडसे, व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी एच.आर.निरंकारी, डॉ. नरेंद्र माळी, डॉ. मानसी कदम आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती.



Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!