…अखेरचा हा तुम्हा दंडवत !!!
बांबवडे :महाराष्ट्राच्या राजकारणातील खंबीर आणि खळखळतं नेतृत्व अकाली हरपलं. राज्याच्या राजकारणातील धुरंधर माणूस अजितदादांच्या रूपाने आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नुकसान झाले आहे. परंतु त्यासोबत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेची कणव असणारा नेता अनंतात विलीन झाला आहे. अशा या अष्टपैलू नेतृत्वाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, दैनिक किल्ला,व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने अखेरचा हा तुम्हा दंडवत …

अजितदादा म्हणजे शिस्तशीर आणि हजरजबाबी नेतृत्व होतं. त्यांनी स्वत:च्या कर्तुत्वातून राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं होतं. ते अनेकवेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले देखील, पण मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न मात्र स्वप्नंच राहिलं. त्या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं. यासाठी त्यांना अनेकवेळा संधी आली, पण ती प्रत्यक्षात उतरली नाही. रात्रीचा शपथविधी असो, कि, राष्ट्रवादी पक्ष मिळविण्याचा अट्टाहास असो, या गोष्टी घडल्या, पण स्वप्न मात्र काही पावलं दूरच राहीलं. असे जरी असले, तरी त्यांनी आपला कार्यकर्ता मात्र कधीही वाऱ्यावर सोडला नाही. कार्यकर्ता चुकला,तरी त्याला त्यांनी अर्ध्यावर सोडला नाही. कार्यकर्त्यावर समाजात अनेक आरोप झाले,तरी कार्यकर्त्याचा हात घट्ट धरून ठेवणारे हे एकमेव नेतृत्व होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात लाडक्या बहिणींचा हा भाऊ अकाली निघून गेल्याने महिला वर्गात देखील दादांविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या अर्थकारणात अजितदादांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याची आर्थिक जबादारी सांभाळली होती. प्रशासकीय निर्णय क्षमता, थेट बोलण्याची शैली, आणि जलद निर्णयांसाठी ते प्रसिद्ध होते.
राज्यातील विकासकामांच्या बाबतीत बोलताना सिंचन, जलसंधारण, शेती या क्षेत्रांच्या विकासावार त्यांचा अधिक भर होता. बारामती परिसरात सहकार, शिक्षण व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले. काम आधी राजकारण नंतर अशी त्यांची प्रतिमा होती.
असा हा खंबीर नेता, आज अनंतात विलीन झाला आहे. त्यांच्या स्मृतीना भावपूर्ण आदरांजली.
