अतिक्रमण मुक्त विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण
बांबवडे ( विशेष प्रतिनिधी ): अतिक्रमण मुक्त विशाळगड या मोहिमेंतर्गत किल्ले विशाळगड इथं अनेक शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान विशाळगडावर जाण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने जमाव प्रक्षुब्ध झाला. या दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक, जाळपोळ, तसेच दोन चाकी, चार चाकी वाहनांचे देखील नुकसान करण्यात आले.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने गडावर जाण्यास मज्जाव केल्याने जमाव थांबून होता. दरम्यान अतिक्रमण मुक्त विशाळगड हि मोहीम सुरु केलेले संभाजीराजे छत्रपती यांचे गडाच्या पायथ्याशी आगमन होताच जमावाने ” जय भवानी,जय शिवाजी”, ” विशाळगड अतिक्रमण मुक्त करा”, अशा घोषणा दिल्या. संतापलेल्या शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. गडावर जावू न दिल्याचा संताप शिवप्रेमींनी व्यक्त केला. हे शिवप्रेमी पुणे, सातारा, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून आले होते. प्रशासनाने अडवलेला जमाव संभाजीराजे येताच प्रक्षुब्ध झाला. त्यांनी आपला संताप इतर ठिकाणी काढला. या दरम्यान भरपावसात सिलेंडर चा एका घरात स्फोट झाला. ते घर पेटले.
दरम्यान शिवप्रेमींच्या भावना बाहेर पडल्या,आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दरम्यान जमावाने घराच्या काचा फोडल्या.आणि घर पेटवले. या दरम्यान काही शिवप्रेमी जखमी झाले. हनुमंत वसंत जाधव इस्लामपूर वय २५ वर्षे, सिराज अडसुळे वय २१ वर्षे पुणे, प्रसाद संतोष रोकडे वय २१ वर्षे शिरूर पुणे, मयूर राजीवडे वय २६ वर्षे पुणे, धनश्री मोहरे वय १८ वर्षे राहणार तळेगाव दाभाडे आदी मंडळी जखमी झाले आहेत.
दरम्यान घटनास्थळी जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे, जिल्हा पोलिसप्रमुख श्री महेंद्र पंडित, येथील प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासहित अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.