अन्नसुरक्षा योजनेचे निकष रद्द करावेत,अन्यथा आंदोलन – जय शिवराय किसान संघटना
बांबवडे प्रतिनिधी : अन्नसुरक्षा योजनेतून, ज्यांची घरे आर.सी.सी. आहेत, व ज्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे, अशांची नावे योजनेतून रद्द करणेबाबत शासनाने आदेश काढले आहेत. सदर च्या योजनेतील नावे रद्द करण्याबाबत चे निकष चुकीचे आहेत, त्यामुळे हे आदेश रद्द करणेत यावेत, अन्यथा संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल , अशा आशयाचा इशारा, निवेदनाच्या माध्यमातून शाहुवाडी तहसीलदार कार्यालयाला जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी जय शिवराय किसान संघटनेचे निवेदन स्वीकारले.

याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, ज्यांची घरे आर.सी.सी. आहेत, त्यांची नावे रद्द करण्यात यावीत. परंतु शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून आयुष्यासाठी निवारा निर्माण केलेला असतो. सध्या बहुतांश घरे आरसीसी आहेत. त्यामुळे ९० % शेतकरी या निकषाद्वारे अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडतील.

तसेच अनेक बेरोजगार तरुणांनी रोजगारासाठी चार चाकी वाहन कर्ज काढून घेतलेले असते. ती तरुण मंडळी रोजगाराच्या संधी साठी कर्जाने वाहन घेतात. त्याचे व्याज देखील देतात. त्यांच्या माध्यमातून शासनाला महसूल सुद्धा मिळतो. चार चाकी वाहनांच्या या निकषामुळे हा तरुण वर्ग देखील या योजनेपासून वंचित राहू शकतो.

त्यामुळे सदरचे निकष चुकीचे असून, याद्वारे ९० % जनता या अन्नसुरक्षा योजनेला मुकणार आहेत. सध्या शासकीय नोकरदारांना सुद्धा प्रति वर्षी वाढीव महागाई भत्ता देण्यात येतो. परंतु शेतकरी, कष्टकरी जनतेला मात्र अशा प्रकारचा कोणताही महागाई भत्ता अथवा अनुदान मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत कोणतीही तक्रार न करता, हि ९० % जनता बिनबोभाट आपलं जीनं जगत आहे. परंतु अन्न सुरक्षा योजनेतील लावलेले सदरचे निकष शेतकरी कष्टकरी वर्गाची अवहेलना करणारे आहेत. तेंव्हा सदरचे निकष रद्द करावेत, अन्यथा जय शिवराय किसान संघटना तीव्र आंदोलन करेल, याची शासनाने दखल घ्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

सदर च्या निवेदनावर सर्वश्री शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, उत्तम पाटील, बाजीराव पाटील, गणेश पाटील, शीतल कांबळे, भैरवनाथ मगदूम, तातोबा कोळी, धनाजी पाटील, दत्तात्रय कृष्णात पाटील आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.