अमेणी घाटातील अपघातात ५ वर्षीय बालकाचा मृत्यू
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यतील अमेणी घाटातील एका वळणावर एका हिरो स्प्लेंडर दुचाकीचा अपघात होवून, या अपघातात ५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.१७ मे रोजी सकाळी इस्लामपूर हून येळवण जुगाई इथं देवदर्शनासाठी माधवी महेश उरुणकर वय २७ वर्षे त्यांचा भाऊ व त्यांचा मुलगा आर्यन महेश उरुणकर वय ५ वर्षे असे तिघेजण एका दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांचा भाऊ राज गणेश पोवार वय १५ वर्षे हा हिरो स्प्लेंडर क्र. MH10- DB – 8151 दुचाकी चालवीत होता. दरम्यान अमेणी घाटातील एका वळणावर ब्रेक मध्ये पाय अडकल्याने गाडी अडकली, या दरम्यान माधवी यांनी गाडीवरून उडी मारली. यावेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा आर्यन उरुणकर हा देखील उडून खाली पडला. या दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आर्यन उरुणकर याचे शव विच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालय इथं करण्यात आले. तर माधवी उरुणकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूर इथं नेण्यात आले.