…अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…
बांबवडे : उष:काल होता, होता, काळरात्र जाहली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. असा अलिखित संदेश जनमानसापर्यंत, शिवसैनिकांपर्यंत काल दि.२९ जून रोजी च पोहचला आहे. शिवसेनेचं एक अनोखं चित्र उद्धव ठाकरे यांच्या रूपाने सामोरं आलेलं, महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. म्हणूनच केवळ शिवसैनिक नव्हे तर स्वाभिमानी असलेला अवघा महाराष्ट्र हळहळला होता. परंतु शिवसैनिक पुन्हा नव्या जोमाने उभे राहतील, शिवसेना काय आहे, ते सिद्ध करतील, असा दृढनिश्चय शिव्सैनिकांमधून कालपासून दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्व किती प्रामाणिक आणि हळवं आहे, याची प्रचीती अवघ्या महाराष्ट्राला आली आहे. सत्तेसाठी कधीही लालची नसणारे हे व्यक्तिमत्व मोठ्या स्वाभिमानाने मुख्मात्री पदावरून पायउतार झालं. हीच खरी स्वाभिमानी महाराष्ट्राची ओळख त्यांनी अवघ्या देशाला दाखवून दिली.

भाजप ने सत्तेसाठी कितीही चाणाक्ष मुत्सद्दीगिरी केली, तरी ती एक कुटनीती होती, हे महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं नाही. चाणाक्ष असणं, हे गैर नाही पण कुटनीती करून, महाराष्ट्राला आपण किती साळसूद आहोत, हे दाखविण्यात ते कमी पडले नाहीत. कारण आम्ही मागेच म्हणालो होतो, कि, ” घर का भेदी लंका ढाय “. हे मात्र आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे असताना, यांना महाराष्ट्रात कोणीही विचारंत नव्हतं, त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे यांच्यासारख्या स्वाभिमानी मंडळींना पुढे करून, शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात यांनी पाय ठेवला. त्यावेळी केंद्र आम्ही पाहतो,राज्य तुम्ही पहा, या अटीवर शिवसेनेशी युती झाली होती. परंतु त्या तिघांपैकी सगळेच निधन पावल्यानंतर, मात्र साक्षीला आता कोणीच नाही, याचा गैरफायदा घेवून सत्ता काबीज केली.

जि मंडळी सांगत आहेत, आम्ही शिवसेनेसोबत आहोत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. असे सांगणे म्हणजे अंगावरील लक्तरे झालेल्या कपड्यांनी आपली आब्रू झाकण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, हे न समजण्या इतकी जनता साधी राहिलेली नाही. काय झाडी, काय डोंगार असे म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतांमध्ये कधीतरी फेरफटका मारावा, त्यांना गुवाहातीपेक्षा अधिक निसर्ग महाराष्ट्रात पाहायला मिळेल. पण दुसऱ्यांच्या पैशावर मजा मारणाऱ्यांना निसर्ग सुद्धा जवळ करणार नाही. जि मंडळी बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांचे विचार जोपासण्याच्या ज्या आरोळ्या ठोकत आहेत, त्यांना दिघेसाहेबांचा आत्मा क्षमा करणार नाही. कारण आनादाश्रम मध्ये गद्दारांना क्षमा नाही, हे खुद्द दिघेसाहेबानीच सांगितले होते. ज्यांनी शिवसेनेच्या भगव्यासोबत प्रतारणा केली, ते काय हिंदुत्व सांभाळणार ? याची जाणीव त्यांना स्वत:ला सुद्धा आहे. ज्या सुरतेला छत्रपतींनी सळो कि, पळो करून सोडलं होत ,त्याच सुरतेमध्ये लपण्यासाठी जेंव्हा आपण गेलात, तेंव्हाच छत्रपतींनी तुमच्याशी असलेली नाळ तोडून टाकली असेल, अशांनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये, असेच अवघ्या महाराष्ट्राचे मत आहे.

असो. जे गेले ते गेले. पण शिवसैनिकांनो पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली. आणि नवी शिवसेना निर्माण करा. ज्यामध्ये प्रामाणिक आणि स्वाभिमानी शिवसैनिक असतील. आज जरी तुम्हाला अपमानाचे चटके बसले असतील, तरी भविष्यात तुम्ही भगव्या मुशीतून तावून सुलाखून निघालेले शिवसैनिक असाल, तुम्हाला कुणी गद्दार म्हणणार नाही, आणि सोनं जेंव्हा भट्टीतुन तावून सुलाखून निघतं, तेंव्हा ते अधिक उजळू लागतं. आज सर्वसामान्य माणूस शिवसैनिकांसोबत निश्चित उभा राहील, कारण ज्या मंडळींनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला, ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आपल्याला शिवसेनेच्या नव्या पर्वाच्या भगव्या शुभेच्छा.