…इथं मयत इसमास ही रेशन मिळतंय ?
बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी येथील रेशन दुकानदाराने मयत इसमांच्या नावावरचे, तसेच लग्न होवून सासरी गेलेल्या लेकीबाळींच्या नावावरचे रेशन गिळंकृत करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भाने येथील ग्रामस्थांनी तक्रारीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. या अनुषंगाने सदर च्या दुकानदाराची कसून चौकशी करून, त्यांचा धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी देखील या निवेदनात केली आहे.
सध्या सुरु असलेल्या कोरोना संक्रमणाच्या काळात लोकांना अन्नधान्य मिळत नाही. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत, एकीकडे लोकांना अन्नधान्य मोफत वाटण्याचा खटाटोप शासन करीत असताना, मयत इसमांचे रेशन फस्त करण्याचा अघोरी प्रकार येथील रेशन दुकानदार करीत असल्याने, मयताच्या टाळू वरचे लोणी खाणे, म्हणजे काय असते, ते खऱ्या अर्थाने आज समोर येत आहे. यामध्ये सुमारे २८ मयत इसम, व सुमारे ५२ लग्न होवून गेलेल्या मुलींच्या नावाचे रेशन गायब करण्याचा प्रकार इथं घडत आहे.
निवेदनात नमूद केलेल्या म्हणण्यानुसार, सदरचा भ्रष्टाचार २००३ सालापासून सुरु असून, हि बाब अद्याप शासनच्या निदर्शनास कशी आली नाही, हे सुद्धा आश्चर्य आहे. रेशन कार्ड वरील नाव रद्द केले जाते, पण त्याची नोंद शासन दरबारी ऑनलाईन न करणेत आल्याने, त्यांच्या नावाचे रेशन हे कायमस्वरूपी येत राहिले. त्यामुळे मयत इसम अथवा लग्न होवून सासरी गेलेल्या मुलींची नावे, रेशन कार्ड वरून जरी कमी झाली, तरी शासन दरबारी ती आहे, तशीच आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचे रेशन त्यांच्या कुटुंबियांना न देता, हे महाशय फस्त करीत राहिले. अशा सुमारे १६ वर्षांपासून आजपर्यंत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होवून अशा मंडळींवर कठोर कारवाई व्हावी, अशा आशयाची मागणी सदरच्या निवेदनातून परखंदळे ग्रामस्थांनी केली आहे.
सदरच्या निवेदनावर बाबुराव सुतार, भीमराव परीट, निवास लव्हटे, भरत सुतार, सीताराम पाटील, सिद्धार्थ कांबळे, अमोल गोंधळी, दिलीप कांबळे आदी ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.