इथं मृत्यू सुद्धा ओशाळला असेल…
बांबवडे : संशयाच्या भुताने एका चिमुकल्याचा बळी घेतला. त्याला मिळालेल्या मरणयातना पाहून साक्षात मृत्यू सुद्धा ओशाळला असेल. अशाच त्या यातना असाव्यात. पती-पत्नी च्या भांडणात एका चिमुकल्याचा नाहक बळी गेला.

हे निर्घृण कृत्य घडताना त्या बालकाला पुसटशी सुद्धा कल्पना नसेल, कि, मृत्यू दबक्या पावलाने आपल्यावर घाला घालणार आहे. मुलं नेहमी आपल्या आई- वडिलांच्या सान्निध्यात स्वत:ला सुरक्षित समजतात. पण इथं तर बापंच मारेकरी बनला, तर बापड्या त्या कोवळ्या जीवाने कुणाकडे पाहावे ? यावेळी परमेश्वराला सुद्धा त्याची जरासुद्धा दया येवू नये, हेही नवंलच आहे. बापाने पहिली बुक्की छातीत मारल्यावरंच ते निपचित पडलं असावं, आणि त्यानंतर या बहाद्दराने त्याचा गळा घोटला. काय ते शौर्य ! पहिल्या बुक्कीत बिचाऱ्याला कळलं सुद्धा नसेल कि, नेमकं हे काय घडतंय. आणि त्यानंतर तेवत असलेली ज्योत हळूहळू मालवली असावी. आणि यानंतर झाला तो काळाकुट्ट अंधार. आणि अंधार तोही माणुसकीचा. बाप आणि मुलाच्या नात्यातला अंधार. मानवतेला काळिमा फासणारा अंधार.

हि घटना आहे शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव केसरे या बालकाच्या अपहरण नाट्यापासून ते पडक्या वाड्यातील कडब्याखाली असलेल्या निर्जीव प्रेतापर्यंत. आयुष्यात माणसाला मरण येतं ,हे जरी निश्चित असलं, तरी मरणयातना कशा असतात, हे मात्र त्या चिमुकल्या जीवाने अनुभवल्या, आणि यावेळी त्याच्यासोबत होता, तो म्हणजे फक्त मृत्यू.

सध्या सुशिक्षित कुणाला म्हणावं हा एक प्रश्नच आहे. कारण आपण स्वत:ला सुशिक्षित म्हणवतो पण स्वत:च्या स्वातंत्र्याबाबत हक्क सांगणारी मंडळी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याबाबत मात्र कानाडोळा करतात. एकीकडे प्रेमविवाह करायचा , आणि दुसरीकडे त्याच प्रेमावर संशय घ्यायचा, हि एकूण परिस्थिती वारणा कापशी येथील आरव राकेश केसरे या चिमुकल्या जीवाचा निर्घृण खून झाला, यातून समजली.

राकेश केसरे या नराधमाने त्या चिमुकल्या जीवाचा बळी घेतला हे निर्विकार पणे सांगितले. राकेश ला बाप म्हणायला सुद्धा लाज वाटते, कारण आई आणि बाप काय असतात, ते त्यांना विचारा ज्यांना अपत्ये नसतात. ती मंडळी अनाथ आश्रमातून मुले दत्तक घेवून त्यांचे पालनपोषण करतात,त्यांना शिकवतात, आणि समाजात माणूस म्हणून जगायला शिकवतात. ती एक विचारसरणी आणि स्वत:ला मुले होवून त्यांच्याविषयी एवढी घृणा बाळगणारा नराधम सुद्धा इथलाच आहे. हि एक विचारसरणी.

एकंदरीत वारणा कापशी हे गाव नदीकाठी असल्याने बऱ्यापैकी सधन. या गावात शेतकरीसुद्धा राहतात, शिक्षक , बुद्धीजीवी वर्ग सुद्धा याच गावातील. इथं पैलवानांची परंपरा आहे, तर पत्रकारांची संख्या बऱ्यापैकी आहे. तरीसुद्धा गावाला काळिमा फासणारी माणसे सुद्धा इथंच आहेत. हे देखील तितकेच सत्य आहे.

या प्रकरणात पोलीस खात्याने मात्र रात्र आणि दिवस एक केला. पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले हि अभिनंदनाची बाब आहे.