उचत येथील मागासवर्गीय विद्यार्थी मारहाण बाबत कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन – भारतीय दलित महासंघ
बांबवडे प्रतिनिधी : भारतीय दलित महासंघाच्या वतीने उचत तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर मधील पहिली च्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षिकेने केलेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, सदर च्या निवेदनाची गंभीर दाखल न घेतल्यास गुरुवार दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी शाहुवाडी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले असून, सदर निवेदनाची प्रत जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.

दरम्यान आठ दिवसांपूर्वी उचत येथील आरुष अरविंद कांबळे या पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षिका हेमलता कुंभार यांनी वळ उठेपर्यंत मारहाण केली. याबाबत विद्यार्थ्याचे चुलते आनंदराव कामत यांनी लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने भारतीय दलित महासंघाने सदर चे निवेदन अधिकाऱ्यांना दिले आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, उचत प्राथमिक विद्यामंदिर मधील शिक्षिका हेमलता कुंभार यांच्यावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना शिक्षक सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात यावे. सदर ची घटना निंदनीय असून, शिक्षण सेवेला काळिमा फासणारी आहे. यामुळे संबंधित विद्यार्थी संविधानिक शिक्षण हक्कापासून वंचित राहू शकतो.

भारतीय संविधान व शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असून, ते अल्पवयीन मुलांना भीती न दाखवता ते मुक्तपणे देण्यात यावे. व शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवावी. अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु शिक्षकांच्या हिंसक प्रवृत्तीमुळे अल्पवयीन मुलांचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होवू लागले आहे. तरी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून कारवाई करावी, अन्यथा भारतीय दलित महासंघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. याची प्रशासनाने दखल घ्यावी.

सदर च्या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, मानसिंग आडके, प्रदीप माने, आकाश कांबळे, दयानंद कांबळे, अभिषेक गोसावी, जनार्दन कांबळे, किरण कांबळे, नाना लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.