” उभारू पुस्तकांची गुढी ” : श्री जगताप गुरुजी
शाहुवाडी : येळाणे तालुका शाहुवाडी येथील राहणारे जगताप गुरुजींनी पारंपारिक प्रथेला फाटा देवून घरातील ग्रंथालयातील व स्वलिखित पुस्तकांची गुढी उभारून , गुढी पाडव्याची दिवशी परिवर्तनाचे तोरण दारी बांधले आहे.

केंद्रीय प्राथमिक शाळा माण येथील पदवीधर अध्यापक श्री संजय जगताप गुरुजींनी पुस्तकांची ज्ञानाची आणि परिवर्तनाची गुढी उभारण्याची परंपरा गेल्या वर्षांपासून सुरु केली आहे. त्यांच्या या नव्या उपक्रमाला त्यांची पत्नी सौ वंदना यांनी सुद्धा त्यांना साथ दिली आहे.
पुस्तकांची गुढी उभारण्याचे हे दुसरे वर्ष असल्याचे जगताप गुरुजी सांगतात. यावेळी ते पुढे म्हणाले कि, ‘ वाचाल तर वाचाल ‘ या उक्तीप्रमाणे समाजात वाचण्याची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीकोनातून त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली असल्याचे सांगितले.

त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी व्ही.टी. पाटील फौंडेशन कोल्हापूर च्या माध्यमातून ‘ वाचू आनंदे ‘ हा प्रकल्प सुरु केला आहे. श्री जगताप सर उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.