एकीकडे महागाई चा कहर, तर दुसरीकडे उन्हाचा तडाका
शाहुवाडी प्रतिनिधी : सध्या शाहुवाडी तालुक्यात सुद्धा उन्हामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या अगोदर सुद्धा उन्हाळा असायचा ,पण उन्हाची तीव्रता या अगोदर एवढी कधीच जाणवली नाही, कि जि सध्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळेत घराबाहेर न पडणे, हेच पसंत केले आहे.

शाहुवाडी तालुका हा निसर्ग संपन्न आहे. त्यामुळे या तालुक्याला उन्हाचा तसा फारसा त्रास कधी या अगोदर जाणवला नव्हता. परंतु या वर्षीचे ऊन निश्चितच कमाल तापमान गाठत असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्द झाडीच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत राहिलेल्या शाहुवाडी तालुक्याला अपरीमीत कष्टाची सवय आहे. अनेक उन्हं इथल्या जनतेने आपल्या डोक्यावर लीलया पेलली आहेत. परंतु या वर्षीचा उन्हाळा खूपच कडक असल्याने शेतकरी वर्ग सुद्धा घामाघूम झाला आहे. या आठवड्यात उन्हाचे तापमान ३० अंश सेल्सियस च्या पुढे गेले आहे.

एकीकडे दिवसेंदिवस वाढत असलेले पेट्रोल आणि डीझेल दर प्रती दिवशी ८० पैशांच्यावर वाढत आहे. यामुळे सामान्य वर्ग अगोदरच घामाघूम झाला आहे. कारण या इंधन दरवाढीमुळे सर्व उत्पादनांवर परिणाम होत आहे. गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर गरीब वर्गाला हातातोंडाशी गाठ घालणं दिवसेंदिवस कठीण होवू लागलं आहे.

एकीकडे दिवसेंदिवस महागाई चा कहर होवू लागला आहे, तर दुसरीकडे उन्हाच्या कडाक्याने सामान्य वर्गाला तडाका बसू लागला आहे. यासाठी कोणाला जबाबदार धरावे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावू लागला आहे.