…एक ” अंत ” जिव्हारी चा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील होलसेल, रिटेल किराणा मालाचे व्यापारी रवींद्र सदानंद फाटक यांचे अल्पश: आजाराने दि.५ सप्टेंबर रोजी निधन झाले. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. सा.शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बांबवडे व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष व पंचक्रोशीतील एक सामाजिक व्यक्तिमत्व त्यांच्या निधनाने हरपले आहे. प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा अंत समाजाच्या जिव्हारी लागला आहे. कारण गावातील आणि पंचक्रोशीतील कोणत्याही कामात आवर्जून आपली उपस्थिती दर्शवणारे हे व्यक्तिमत्व नेहमीच असाधारण राहिले आहे. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक व्यक्तीसाठी रवीशेठ सारखेच होते. नुकत्याच त्यांना झालेल्या व्याधी कळल्यावर समाज व्यथित झाला होता. परंतु काहीच दिवसात त्यांना पुन्हा सामाजिक कार्यक्रमात पाहता,सगळ्यांनाच हायसं वाटलं. असं हे व्यक्तिमत्व कोणालाही कल्पना न देता काळाच्या पडद्याआड झालं. त्यांच्या निधनाने त्यांचे जवळचे मित्र व बांबवडे नागरी सह.पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब खुटाळे उर्फ आप्पा यांनी एसपीएस नुज शी बोलताना सांगितले कि, रवीशेठ यांचा मृत्यू म्हणजे एक जिव्हारी लागणारा ” अंत ” ठरला. कारण व्यावसायिक असो वा सामाजिक कोणताही प्रश्न आम्ही दोघे एकत्र बसून निर्णय घेत असू. त्यांच्या या अकाली एक्झिट मुळे खूपच अस्वस्थता जाणवू लागली आहे. आमच्या व्यापारी बंधूंच्या वतीने त्यांना आम्ही आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. असेही श्री बाळासाहेब खुटाळे यांनी सांगितले.