कारखानदारी अडचणीत आहे असे म्हणणे, म्हणजे केवळ दिशाभूल- जालिंदर पाटील
बांबवडे : जयसिंगपूर तालुका शिरोळ इथं होणारी २० वी ऊस परिषद १९ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न होत असून, या परिषदेला शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून हि परिषद यशस्वी करावी, यासाठी जनजागृती करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, यांच्यासह अनेक नेत्यांनी केले.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ” स्वाभिमानी शेतकरी संघटने ” च्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदावरून श्री जालिंदर पाटील बोलत होते.

यावेळी पाटील पुढे म्हणाले कि, भविष्यात २०२१ व २२ हा काळ शेतकऱ्यांसाठी चांगला काळ असून, शेतकऱ्यांना चांगला नफा होईल, अशी अपेक्षा आहे. ब्राझील सारख्या देशात एका कारखान्यात १०० लोकं काम करतात, तर आमच्याकडील कारखान्यात ९०० ते १६०० कामगार काम करतात. तसेच साखरेच्या दरात दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे. तरीदेखील या मंडळींच्या दृष्टीने कारखाने अडचणीत आहेत. दरम्यान मळीपासून सहा उप पदार्थ तयार होतात. बगॅस पासून २१ उपपदार्थ तयार होतात. अशी परिस्थिती असतानाही कारखानदारी अडचणीत आहे .असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासारखे आहे.

यावेळी सागर शंभू शेटे म्हणाले कि, आंदोलनासाठी येणाऱ्या लोकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. परंतु भविष्यात संघटना या मंडळींसाठी निश्चित काही ना काही करणार आहे. तेंव्हा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सागर शंभू शेटे यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, अजित पवार, तालुकाध्यक्ष वसंत पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश म्हाऊटकर यांनी केले. यावेळी अवधूत जानकर, रामलिंग पाटील, यशवंत शेळके, पद्मसिंह पाटील, गुरुनाथ शिंदे, सुनील पाटील व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते..