कृषी सेवा केंद्र चालकांच्या बंदमध्ये सहकारी संघानी देखील सहभागी व्हावे यासाठी निवेदन
शाहुवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी सेवा केंद्र संदर्भात नवीन पारित होत असलेल्या कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी दोन नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर अखेर महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहेत. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व सहकारी संघानी देखील सहभागी व्हावे, यासाठी कोल्हापूर जिल्हा बियाणे, कीटकनाशके, खते संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .
शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व्हावा, यासाठी शासनाने विशेष दखल घेतली आहे . याच अनुषंगाने नवीन कायदे पारित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे . या नवीन कायद्याच्या धोरणात कृषी सेवा केंद्र चालकांना अनेक जाचक अटींना सामोरे जावे लागणार आहे . यासाठी राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक दोन नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत आपली सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवून, या कायद्याला विरोध दर्शवणार आहेत .
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या सर्वच सहकारी खरेदी विक्री संघानी देखील या बंदमध्ये सहभागी होऊन या जटील आणि अन्यायकारक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सहभागी व्हावे. अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बियाणे, खते, कीटकनाशके संघटनेच्या वतीने सर्व संघांना दिली आहे .
यावेळी अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सागर खाडे, खजाणीस अशोक श्री श्रीमाळ ,यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्याच्या विविध भागातील कृषी सेवा केंद्र संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .