कोरोना काळातील गुन्हे मागे घ्यावेत- भारतीय दलित महासंघ
बांबवडे प्रतिनिधी : कोरोना काळात दाखल झालेले ३ लाख गुन्हे शासनाने मागे घ्याबेत, अशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आले आहे.

कोरोना साथ रोगाचा मुकाबला करण्यासाठी , महाराष्ट्र राज्यात अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले होते. त्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा तसेच भारतीय दंडसंहितेतील काही अनुच्छेद यांचा वापर करून, अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले होते. संबंधित कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे ३ लाख गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ज्या युवकांवर, विद्यार्थी- विद्यार्थिनींवर हे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना भविष्यात नोकरी मिळणेसाठी यामुळे अडचणी येवू शकतात. परिणामी सुशिक्षित बेरोजगारी चा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होवू शकतो. शैक्षणिक गुणवत्ता असणाऱ्या आणि शासकीय सेवेत जाण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांचे करिअर खराब होवू शकते.


शासन व प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून कोरोना काळातील तीन लाख गुन्हे मागे घ्यावेत, अशा आशयाची विनंती देखील या निवेदनातून करण्यात आली आहे.

सदरच्या निवेदनावर विशाल खांडेकर, बबलू चौगुले, दयानंद शिवजातक, अविनाश गायकवाड, संजय बागुल, श्रावण जाधव आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.