कोरोना मुक्तीसाठी च ” सुपर स्प्रेडर्स तपासणी ” मोहीम : सभापती हंबीरराव पाटील
बांबवडे : ज्या ठिकाणाहून कोरोना चा फैलाव सर्वाधिक होवू शकतो, अशा ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कुणीही घाबरून जावू नये. जरी अहवाल पॉझीटीव्ह आला, तरी त्यांना लागलीच नेवून क्वॉरंटाइन करणार नसून सर्वप्रथम त्यांना घरीच क्वॉरंटाइन केले जाईल. तशीच गरज असेल, तरच त्यांच्या आरोग्याच्या सुस्थिती साठी अॅडमिट करण्यात येईल, तेंव्हा नागरिकांनी घाबरून न जाता, स्वत: च्या सुदृढ आरोग्यासाठी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या जबाबदारी साठी, पुढे येवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद चे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांनी केले.

भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटे ला आवर घालण्यासाठी ” सुपर स्प्रेडर्स तपासणी ” च्या पायलट प्रोजेक्ट चे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषद चे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू यांच्या हस्ते शाहुवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे इथं संपन्न झाले. कोल्हापूर जिल्ह्यात ” सुपर स्प्रेडर्स तपासणी ” चा प्रयोग करण्यात येणार आहे. कारण भविष्यात कोरोना ची दुसरी लाट प्रभावित असू नये, यासाठी हि खबरदारी घेण्यात आली आहे.

यावेळी आरोग्य सभापती पुढे म्हणाले कि, येणारे पुढील महिने थंडीचे असणार आहेत. हे वातावरण कोरोना साठी पोषक असणार आहे. यामुळे अगोदर खबरदारी घेण्यासाठी हे प्रयोजन करण्यात आले आहे. सध्या लक्षणे नसलेली मंडळी सुद्धा पॉझीटीव्ह असू शकतात. अशा लोकांपासून या महामारी चा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर होवू शकतो. यासाठी गर्दीच्या ठिकाणी असलेली मंडळी, म्हणजेच दुकानदार, त्यांच्यातील कर्मचारी, भाजीपाला , फळ विक्रेते, किंवा अशी ठिकाणे कि, ज्याठिकाणी सर्वाधिक लोकं एकत्र येतात, अशा ठिकाणी असलेल्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वत:ची तपासणी करून समाजकार्यास हातभार लावावा. यामध्ये कोणालाही जाणूनबुजून त्रास देण्याचा हेतू नाही. परंतु ह्या महामारीची लक्षणे नसली, तरी त्यांचा प्रादुर्भाव असतो. म्हणूनच नागरिकांनी जागरूक राहून, या महामारी चे उत्थान करावे, व आपला जिल्हा कोरोना मुक्त करण्यास सहकार्य करावे, असेही आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले.

दरम्यान कोरोना काळात डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी वृंद, त्याचबरोबर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका,मदतनीस, प्राथमिक शिक्षक अशा तळागाळात काम करणाऱ्या मंडळींनी मोलाची भूमिका आजवर बजावली आहे. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. यापुढे सुद्धा असेच सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा आरोग्य सभापती श्री पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे यावेळी म्हणाले कि, सध्या कोरोना प्रादुर्भावाची संख्या कमी असली, तरी येणारे महिने थंडीचे आहेत. हे वातावरण कोरोना साठी पोषक असणारे आहे. यासाठी जागरूक रहाणे हि काळाची गरज आहे. ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” हि संकल्पना खऱ्या अर्थाने रुजविण्यासाठी, कोरोना ला समूळ उपटून टाकले पाहिजे. यासाठी ” सुपर स्प्रेडर्स तपासणी ” मोहीम गरजेची आहे. यासाठी सर्व नागरिकांनी दुकानदारांनी भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनी स्वत:हून पुढे येवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सुद्धा श्री वाघमारे यांनी केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी एच.आर. निरंकारी म्हणाले कि, सध्या कोरोना संपला, अशी भावना रुजू लागली आहे. परंतु येत्या काही दिवसात थंडी सुरु होणार आहे.याकाळात कोरोना पुन्हा डोके वर काढणार आहे. हे रोखण्यासाठी सुपर स्प्रेडर्स वाढण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी हि मोहीम आहे. यासाठी नागरिकांनी स्वत: पुढे येवून तपासणी करून घ्यावी,ज्यामुळे कोरोना रोखण्यास आपल्याला मदत होईल, असेही श्री निरंकारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जि.प.सदस्य विजयराव बोरगे, वैद्यकीय अधिकारी दिपाली जद, पर्यवेक्षक सुभाषराव यादव, कृष्णात मोहिते, धनाजी लोहार, आरोग्य कर्मचारी वृंद, ए.पी. पजई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी लोहार यांनी केले,तर कार्यक्रमाचे आभार तानाजी पाटील यांनी मानले.