कोविड योध्यांपैकी ” एक तुपाशी, तर एक उपाशी ? “
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कोविड केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेलं नाही. ज्या मंडळींनी आपले जीव धोक्यात घालून खऱ्या अर्थाने देवदूताचे काम केले, त्यांची झोळी अद्यापही रिकामीच आहे. एवढे असूनही त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन केलेलं नाही. यावरून या मंडळींची सहिष्णुता दिसून येते. याचा अर्थ शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्षंच करावं , असा होत नाही. एकीकडे कोरोना योद्धे म्हणून त्यांचा सन्मान करण्याचं नाटक करायचं, आणि दुसरीकडे त्यांच्या कष्टाचा पैसा द्यायचा नाही. शासनाची हि भूमिका अयोग्य आहे. असेच पुढे चालू राहिल्यास शासनाच्या कोणत्याही आवाहनाला कोणी प्रतिसाद देणार नाही, याची नोंद शासनाने घ्यावी. आणि कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन अथवा भत्ता त्वरित देण्यात यावा, अन्यथा जनमानसातून उग्र आंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.

एकीकडे आरोग्य सेवेत दाखल असलेल्यांना त्यांचे पगार व्यवस्थित मिळत आहेत, पण दुसरीकडे कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या कोविड योद्ध्यांना मात्र निधी अभावी वेतन नाही. म्हणजे एक तुपाशी, तर एक उपाशी ? शासनाने अशी भूमिका घेवू नये. याचा अर्थ आरोग्य कर्मचारी या मंडळींवर कोणताही रोष नाही. पण इतर कर्मचाऱ्यांच्यादेखील चुली चालणे गरजेचे आहे.

एकीकडे ” मी जबाबदार ” हि टॅग लाईन समाजात फिरवायची, तर दुसरीकडे रुग्णांना सेवासुश्रुषा देणाऱ्या मंडळींची रोजी रोटी थांबवायची, हे कोणत्याही सामाजिक अथवा शासकीय प्रणालीत बसत नाही. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, या मंडळींनी कामे केलीत,ते तुमच्या खात्याची कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, असे असतानाही त्यांचे वेतन थांबवणे,योग्य नाही. त्यांचे वेतन थांबल्यावर त्यांनी विचारणा केली असता, निधी उपलब्ध नाही,अशी बेजबाबदार उत्तरे त्यांना मिळतात. तसं असेल तर सर्वच आरोग्य विभागाचे वेतन थांबवा. पण तसे होत नाही. यावरून गरीब कर्मचारी मंडळींची भाकरी चोरण्याचे काम, कोण झारीतील शुक्राचार्य करीत आहे, याचा तपास करणे गरजेचे आहे.

यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे आहे, पण तसे होताना मात्र दिसत नाही.
एकंदरीत काय खऱ्या अर्थाने सेवा देणाऱ्या कोविड योध्यांचे वेतन त्वरित मिळण्याची व्यवस्था व्हावी, अशीच मागणी जनतेतून होत आहे.