” क्रिएटीव्ह टीचर्स फोरम ” च्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल प्रदान उपक्रम
शाहुवाडी : १४ नोव्हेंबर हा बालदिन. याचे औचित्य साधून एका गरजू बालकाला शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकल प्रदान करण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम काही ध्येयवेड्या शिक्षक मंडळींनी पार पाडला. अशा मंडळींचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन.

शाहुवाडी तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा माण येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी सार्थक राजेश पाटील या गरजू विद्यार्थ्याला क्रिएटीव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर, या संस्थेच्या ध्येयवेड्या शिक्षकांनी ,तसेच फोरम चे सदस्य असलेले डॉ.संजय जगताप व त्यांच्या पत्नी सौ. वंदना जगताप यांच्या सौजन्याने हि सायकल प्रदान करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात या फोरम ने पन्हाळा तालुक्यातील अति दुर्गम भागातील कोलीक, खापनेवाडी, मानवाड, किसरूळ या शाळेतील २४ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, श्री बी.एम. हिर्डेकर, माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, दिपक जगदाळे, चंद्रकांत निकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजय जगताप यांनी, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आजपर्यंत फोरम च्यावतीने ३९ सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. क्रिएटीव्ह टीचर्स फोरम ने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना १०० सायकल्स वितरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. याशिवाय जिल्ह्यातील पाच किलोमीटर्स हून अधिक पायी प्रवास करणाऱ्या १०० % मुलींना सायकल पुरविण्याचे ध्येय ठेवले आहे.
यावेळी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, पदवीधर अध्यापक संभाजी लोहार, बाळू कस्तुरे, बाबुराव शिंदे, माधवी पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.