गुणवत्तापूर्वक आदर्श शाळेसाठी लोकसहभाग महत्वाचा -श्रीमती भारती बिरजे
शाहुवाडी प्रतिनिधी : विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेचा भौगोलिक परिसर हाच सर्वोत्तम ठेवल्याने , त्या शाळेची गुणवत्ता इतरांना नेहमीच आदर्शवत ठरत असते. यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आणि गरजेचा असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता श्रीमती भारती बिरजे यांनी जिल्हा परिषद शाळा अंत्री खुर्द येथे आयोजित मॉडेल स्कूल विशेष पालक सभेप्रसंगी केले.

सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मॉडेल स्कूल ची संकल्पना पालकांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष पालक सभा जिल्हा परिषद शाळा अंत्री खुर्द येथे आयोजित केली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी गटविकास अधिकारी संतोष राऊत, शिक्षण अधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, शिक्षण विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख, केंद्रप्रमुख तानाजी माने, उप अभियंता श्री तेली, शाखा अभियंता प्रतिक पाटील, अतुल पाटील, श्री खबाले, सरपंच सोनाबाई पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीमती बिरजे पुढे म्हणाल्या कि, स्पर्धात्मक परीक्षेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता हि महत्वाची ठरत आहे. त्यांची मानसिकता आणि त्यांना प्रेरित करणारे घटक हे निर्माण करण्यासाठी शाळाबाह्य परिसरही तितकाच महत्वपूर्ण ठरत आहे. आपल्या गावच्या शाळेची गुणवत्ता आणि भौगोलिक परिस्थिती इतरांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरण्यासाठी लोकसहभाग हा महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. यासाठी लोकसहभाग हा त्या शाळेच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणारा ठरत आहे. यासाठी आपला सहभाग गरजेचा आहे.

यावेळी गटविकास अधिकारी श्री संतोष राऊत यांनी मॉडेल स्कूल आणि त्याची असणारी संकल्पना या बाबींची माहिती उपस्थित पालक वर्ग व सर्वांना दिली.

यावेळी गटशिक्षण अधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान प्रारंभी मुख्याध्यापक विश्वास कुंभार यांनी मॉडेल स्कूल साठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जाणारा निधी आणि त्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम व निधीचा केलेला विनियोग याबाबत सविस्तर विवेचन केले.

लोकसहभाग वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या अहवालानुसार गावातील अशोक चव्हाण, उत्तम पाटील, मानसिंग कुंभार यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये , तर श्रीरंग पाटील यांनी २०००/- रुपये, आणि डॉक्टर सुनील पाटील यांनी १०००/- रुपये अशी आर्थिक मदत यावेळी शाळेसाठी दिली.

या पालकसभेसाठी उप सरपंच अरुण मुळीक, रुपाली चौगुले, वसंत पाटील, त्याचबरोबर माजी सरपंच, उपसरपंच, शिक्षणप्रेमी, डॉक्टर, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकसभा यशस्वी करण्यासाठी अध्यापक संजय पाटील, फत्तेसिंग पाटील, प्रकाश पाटील, अध्यापिका शीतल मुळीक यांनी विशेष परिश्रम घेतले.