गोगवे खून प्रकरणातील इतर आरोपी अद्यापही मोकाट : पिडीत कुटुंबाचा संताप अनावर
बांबवडे प्रतिनिधी : गोगवे तालुका शाहुवाडी इथं बांधकामाच्या वादातून शालन पाटील यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असूनही अद्यापही काही आरोपी मोकाट असल्याचे दिसून येत आहे. यापैकी एक आरोपी किरण पाटील यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. परंतु अद्यापही काही आरोपी बाहेरच असल्याची माहिती शाहुवाडी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, समजते.


दरम्यान या प्रकरणात चार आरोपी नोंदवण्यात आले होते. यापैकी एक न्यायालयीन कोठडीत, तर एक अल्पवयीन असल्याने ज्युविनिअल मध्ये दाखल आहे. परंतु अद्याप दोन आरोपी मात्र २४ ऑक्टोबर पासून मोकाट असल्याचे समजते.


२४ ऑक्टोबर रोजी भिंत बांधकाम करण्याच्या वादात झालेल्या दगडफेकीत शालन पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना उपचारार्थ कोल्हापूर इथं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे काल दि.६ नोव्हेंबर निधन झाले.


यावेळी शालन पाटील यांच्या निधनामुळे कुटुंबीय पोलीस प्रशासनावर संतापले होते. कारण त्यापैकी फक्त एका आरोपीला ताब्यात घेतले होते. दरम्यान दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या शालन पाटील यांचा मृत्यू झाल्याने कलम ३०२ या कलमाचा समावेश करण्यात आला असून, या प्रकरणातील इतर आरोपींना मात्र अद्यापही अटक न झाल्याने पाटील कुटुंबियांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास कुटुंबीय आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.