चांदोली-मुंबई एसटी सेवा सुरु – खाजगी बस चालकांच्या मुजोरीला चाप
उखळू ( मुकुंद कांबळे ) : सांगली जिल्ह्यातील शिराळा एसटी आगाराच्या वतीने चांदोली-मुंबई एसटी बस सेवा सुरु केली आहे. एकीकडे एसटी परिवहन विभागाच्या वतीने सुरु केलेल्या या नव्या फेरी साठी ग्रामीण भागातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुजोर खाजगी बस सेवा चालकांना यामुळे चाप बसणार असल्यामुळे खाजगी बस सेवा चालकांच्या उद्दामपणाला जरब बसणार आहे. परंतु यासाठी सामान्य वर्गाने या एसटी सेवेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शाहुवाडी तालुक्याचे उत्तर विभागाचे शेवटचे टोक असलेल्या चांदोली परिसरातून सुरु केलेल्या या बस सेवेचे सर्वच वर्गातून कौतुक करण्यात येत असून, या बाबत जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कारण ग्रामीण भागातील चाकरमानी वर्ग नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई सारख्या शहरात स्थिरावला आहे. परंतु आपल्या गावाशी असलेली नाळ मात्र त्यांची कायम आहे. यामुळे हा वर्ग सण-समारंभ ,यात्रा, लग्नकार्य अथवा दुखद प्रसंगी आपल्या गावाकडे सातत्याने ये-जा करीत असतो. परंतु यासाठी शासकीय बस सेवा उपलब्ध नसल्याने खाजगी बस चालकांनी मात्र या सामान्य वर्गाला सातत्याने वेठीस धरले. सणासुदीला लोकांकडून अव्वाच्या सव्वा दर घेवून लोकांची सातत्याने लुबाडणूक केली आहे. दरम्यान लोकांकडे दुसरा पर्याय नसल्याने , या खाजगी चालकांची मुजोरी वाढली. याबाबत मुंबई तील तरुण मंडळींनी आवाज देखील उठवला, परंतु आरटीओ विभागाने त्यांच्या डोक्यावर वरद हस्त ठेवल्याने त्यांची हि लुबाडणूक सुरूच राहिली आहे.

शिराळा आगाराने सुरु केलेली हि लाल परी ची सेवा निश्चितच समाधानाची असून, खाजगी बस चालकांची मुजोरी मोडीत काढून, शासनाला चांगला महसूल गोळा करून देणारी ठरत आहे.

यावेळी ग्रामस्थांनी चालक – वाहक यांना शाल श्रीफळ फेटा बांधून त्यांचे अभिनंदन केले, तर प्रवासाला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी शिराळा आगाराचे श्री सचिन सूर्यवंशी एसपीएस न्यूज शी बोलताना म्हणाले कि, हि चांदोली-मुंबई एसटी बस सेवा माफक दरात असून , चांदोली इथून सायंकाळी ५.४५ वाजता बस सुटणार असून,आरळा, शेडगेवाडी, उंडाळे, कराड, सातारा मेगा हायवे मार्गे पनवेल, वाशी, सायन, दादर या मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. मुंबईहून येताना सायंकाळी ७.३० वाजता सुटून याच मार्गे चांदोली पर्यंत येणार आहे. या प्रवासात कोरोना चे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील. असेही श्री सूर्यवंशी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
या नव्याने सुरु झालेल्या पर्यायी एसटी बस सेवेमुळे स्थिर तिकीट दर लाभणार असून,प्रवाशांची पिळवणूक थांबणार आहे, तसेच खाजगी बस चालकांच्या मुजोरीला काही अंशी का होईना चाप बसणार आहे.