” चांदोली राष्ट्रीय उद्यान ” पर्यटनासाठी खुले : पर्यटकांसाठी सुवर्ण संधी
आरळा ( सागर नांगरे ) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका इथं असणारे ” चांदोली राष्ट्रीय उद्यान ” पर्यटकांसाठी खुले झाले असून, पर्यटकांना माफक शुल्क भरून, इथं मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

कोरोना संक्रमणामुळे सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत कोरोना आटोक्यात आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार चांदोली राष्ट्रीय उद्यान देखील सुरु करण्यात आले आहे. वाघ, बिबट्या हे या उद्यानाचे वैशिष्ठ्य आहेत.

त्याचबरोबर पर्यटकांना खुणावणारी अनेक ठिकाणे इथं आहेत. इथं आलात, तर येथील शेवताई मंदिर, सोळंकी सडा, विठ्ठलाई मंदिर, जनाई चा आंबा टॉवर, आणि लपनगृह, हि ठिकाणे देखील येथील वैशिष्ठ्य आहेत.

हि ठिकाणे पाहण्यासाठी संबंधित शासकीय विभागाने इथं माफक शुल्क आकारले आहे. प्रती व्यक्तीस ३०/- रु., ६ वर्षांवरील मुलांना १५/- रु., व त्या खालील लहान मुलांना कोणताही आकार लावला जाणार नाही.त्यांना मोफत पर्यटन करता येणार आहे. तसेच शालेय सहली अत्यल्प दरात, तसेच शासकीय गाईड फी ३००/- रु. असणार आहे.

चांदोली अभयारण्याच्या गेटवरून पर्यटनासाठी असलेल्या वाहनातून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटू शकतात.