जमिनीची धूप रोखण्यास बांबू लागवड करा- राजेंद्र लाड यांचे आवाहन
मलकापूर प्रतिनिधी : कडवी नदी काठ संवर्धन उपक्रमांतर्गत बांबू लागवड उपक्रमाचा प्रारंभ चांदोली येथून करण्यात आला आहे.

जागतिक बांबू दिनानिमित्त शेतकरी सहभागातून बांबू लागवड करण्यात आली. कडवी नदी संवर्धन मोहिमेंतर्गत रुंदीकरण केलेल्या नदीकाठी तीन हजार बांबूंची लागवड करण्याचा निर्धार इथं करण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाने नदी संवर्धनासाठी खास निधी दिल्याने मानोली ते निळे या दरम्यान महामार्गाला समांतर वाहणाऱ्या कडवी नदी चे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरण केलेला नदी काठ सुरक्षित रहावा व जमिनीची धूप होवू नये, म्हणून शेतकरी सहभागातून नदीकाठी बांबूंची लागवड करण्याची मोहीम कडवी नदी संवर्धन समितीने हाती घेतली आहे.

यावेळी समितीचे प्रमुख राजेंद्र लाड यांनी बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेलच, शिवाय पुरापासून नदीकाठ चे, पर्यायाने शेत जमिनीचे, पिकांचे रक्षण होण्यास मदत होते. असे सांगितले. कडवी खोरं अतिवृष्टीचं असल्याने या नदीला नेहमीच पूर येतो. पुराचे पाणी शेत जमिनीत शिरून शिवारातील माती वाहून जाते. नदीकाठी वृक्षारोपण करून जमिनीची धूप रोखण्याचे आवाहन श्री राजेंद्र लाड यांनी केले आहे.

यावेळी सिराज शेख, चांदोबा विकास सेवा संस्थाचे अध्यक्ष संदीप पाटील, युवराज पाटील, भारत पाटील, दिलीप शिंदे, रंगराव पाटील, संजय पाटील सामाजिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री दगडे, वनपाल जासूद आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ.व्ही.टी. पाटील फौंडेशन च्या पुढाकारातून पुणे येथील कोफोर्ज कंपनी च्या सीएसआर फंडातून कडवी नदी काठी वृक्षारोपणास तीस हजारांचा निधी सुपूर्द केला आहे. यातून त्यांनी पर्यावरण पूरक उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे. यासाठी कांचनताई परुळेकर यांचे योगदान लाभले आहे.