ट्रॅक्टर व ट्रक च्या मागे रिफ्लेक्टर लावण्यासंदर्भात शिवसेनेचे निवेदन
बांबवडे : शिवसेनेचे शाहुवाडी तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुख यांच्यावतीने शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शैलजा पाटील यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक च्या मागे रिफ्लेक्टर लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

सध्या ऊसाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक सर्रास रस्त्यावर पाहायला मिळतात. हि मंडळी क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करतात. तसेच त्यांचा वेग सुद्धा मर्यादेपेक्षा अधिक असतो. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी ट्रॅक्टर व ट्रक च्या मागे रिफ्लेक्टर असणे गरजेचे आहे. परंतु सर्रास या गोष्टीकडे कानाडोळा केला जात आहे. तरी संबंधित मंडळींना सूचना द्याव्यात, तसेच सक्ती देखील करावी, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळले जातील.

अशा आशयाचे निवेदन तालुकाप्रमुख दत्ता पोवार, उपतालुकाप्रमुख विजय लाटकर, सचिन मुडशिंगकर, दिनकर लोहार, सतीश तेली, तुषार पाटील, पांडुरंग रवंदे व शिवसैनिक यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्याला दिले.