डोणोली चा ” अनिकेत ” लेफ्टनंट झाला…
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी चे सुपुत्र अनिकेत वैशाली सहदेव कुंभार यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याने, गावातील पहिले सैन्य दलातील अधिकारी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोकराव पोवार यांनी केले.

डोणोली येथील अनिकेत कुंभार यांची राष्ट्रीय रक्षा अकॅडमी ( NDA )पुणे येथे भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झालेबद्दल ग्रामस्थांनी घेतलेल्या सत्कार कार्यक्रमात श्री अशोकराव पोवार बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, अनिकेत हा सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्याने सैन्य दलात अधिकारी व्हायचे, हे ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर प्रामाणिकपणे त्याने आई-वडील व कुटुंबापासून दूर राहून हे देशाच्या विविध राज्यातील सैनिकी शाळेत अभ्यास करून, सैन्य दलात अधिकारी झाला.

सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोकराव पोवार, डी.वाय.एस.पी. शिवाजी जमदाडे, निवृत्त सुभेदार राजेश पाटील, शिवाजी पाटील, विलास पाटील, तुकाराम पाटील, मुख्याध्यापक रवींद्र कुंभार, यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण पूर्ण करून तो गावी आला. या वेळी गावातून अनिकेत यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्स चे हवालदार संजय जांबीलकर , अनिल पाटील, विश्वास पाटील ,सुरेश राठोड उपस्थित होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना अनिकेत कुंभार म्हणाले कि, सैन्य दलात जायचेच, हेच ध्येय ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्याने माझी निवड झाली. कुटुंबातील सर्वांचेच प्रोत्साहन मिळाल्याने, आई,वडील कुटुंबाचे व माझे स्वप्न पूर्ण झाले.

देशसेवेचा वारसा असणारे कुंभार कुटुंब आहे. अनिकेत कुंभार यांच्या कुटुंबामध्ये सख्खे आजोबा लक्ष्मण कुंभार ( वय ६१ ), यांनी २० वर्षे, चुलत आजोबा आनंदा कुंभार (वय ६० वर्षे )यांनी १८ वर्षे, वडील सहदेव कुंभार (वय ४५ वर्षे )यांनी २० वर्षे सैन्य दलात देशसेवा करून निवृत्त झाले आहेत. अनिकेतच्या निवडीने तिसरी पिढी देशसेवेचा वारसा जपत आहे.