तहसीलदार कार्यालयाच्या ” नोटीस ” ला केराची टोपली ? : बांबवडे अंबीरा ओढा संदर्भ
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अंबीरा ओढ्याच्या पात्रात बांधकाम थांबवण्याची तहसीलदारांनी दिलेल्या नोटिशीला संबंधितांनी केराची टोपली दाखवली असल्याचे, समजत आहे. यावर तहसीलदार काय कारवाई करणार याकडे बांबवडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, अंबीरा ओढा हा बांबवडे आणि डोणोली गावांच्या मध्ये आहे. अंबीरा ओढ्याच्या डोणोली कडील दिशेला ओढ्याला लागून आनंदा शंकर पाटील, शैलेश भीमराव पाटील यांची जमीन आहे. त्यांनी त्यांच्या कडील बाजूने अंबीरा ओढा पात्रात संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरु केले होते. दरम्यान सदरच्या कामामुळे ओढ्याचे पात्र बदलू शकते. त्यामुळे बांबवडे येथील ग्रामस्थांचे नुकसान होऊ शकते. तसेच गेल्या वर्षीचा पाऊस पाहता, त्याचप्रमाणे यावर्षी जर पाऊस पडला, तर वित्त हानीबरोबरच जीवितहानी सुद्धा होवू शकते. या अनुषंगाने हे बांधकाम त्वरित थांबवावे, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कार्यालयाला बांबवडे ग्रामस्थांकडून देण्यात आले होते.

त्याचं अनुषंगाने तहसीलदार कार्यालाकडून आनंदा पाटील , व शैलेश पाटील यांना काम थांबविण्याची दि.१३ एप्रिल २०२२ रोजी नोटीस काढली होती. परंतु या नोटीस प्रमाणे बांधकाम थांबवले गेले नाही. याबाबत तहसीलदार काय कारवाई करते, याकडे बांबवडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या त्यांच्या बांधकामामुळे येत्या पावसाळ्यात बांबवडेकरांची वित्तहानी, तसेच जीवितहानी झाल्यास , त्याला प्रशासन जबाबदार राहणार का ? असा प्रश्न सुद्धा ग्रामस्थांतून विचारला जात आहे.