…तालुक्यातील जनता लोकसभेच्या लोकप्रतिनिधींची वाट पाहतेय…
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील जनता सध्या खासदार साहेबांच्या प्रतीक्षेत आहे. मुळात खासदार फंडातून तालुक्याच्या तोंडाला पाने पुसली गेलीत. कोरोनाच्या पडद्याआड खासदार फंड अदृश्य झाला. परंतु सध्या ज्या भूमी अधिगृहित करण्यात आल्या, त्यांची नुकसान भरपाई देताना, मात्र त्या गुळाच्या ढेपेला पंटर मंडळींचे मुंगळे ढसले आहेत, अशी तक्रार सामान्य जनतेकडून ऐकावयास मिळत आहे. अशावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधणारे लोकप्रतिनिधींची जनतेला गरज आहे.

सध्या शाहुवाडी तालुक्यातून बाय पास हायवे जात आहे. त्यातून अनेक मंडळींची शेकडो एकर जमीन अधिगृहित करण्यात येत आहे. परंतु अधिगृहित केलेल्या जमिनीला पंटर च्या माध्यमातून गेल्याशिवाय योग्य किमत मिळत नाही. किमत ठरली असली ,तरी काही कागदी घोडे नाचवून, अधिकारी मंडळी या पंटर मंडळींच्या ओंजळीनेच पाणी पिणे, अधिक पसंद करतात. अशा अवस्थेत तालुक्यातील जनता आहे.

शाहुवाडी तालुक्याच्या वाट्याला खासदार फंडाच्या माध्यमातून काही येणार आहे का ? कि, मागील प्रति वर्षापासून कोरोना मुळे खासदार फंड मिळाला नाही, हेच कारण ऐकावयास मिळणार असेल, तर संपूर्ण देशात खासदार फंड खर्चच झाला नाही,असे म्हणायचे का ? असे अनेक प्रश्न जनतेतून व्यक्त केले जात आहेत.


दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांना झुगारून जनतेने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना निवडून दिले, त्याचे नेमके फलित काय ? हा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे. आज शेट्टी हे माजी खासदार असूनसुद्धा जनतेच्या वीज बिलासंदर्भात ते आजही रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या आंदोलनाला उर्जामंत्री सुद्धा प्रतिसाद देत आहेत. असे असताना विद्यमान खासदार जनतेसाठी रस्त्यावर कधी येणार ? शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहित केल्या जात आहेत, तर मिळणाऱ्या नुकसान भरपाई ला एजंट चे मुंगळे ढसत आहेत. त्यात वरिष्ठ अधिकारी वर्ग सुद्धा समाविष्ट असल्याचे बोलले जात आहे. अशावेळी जनता आपल्या लोकसभेच्या लोकप्रतिनिधींची वाट पहात आहे.