दलितवस्ती सुधार चा निधी अन्यत्र वापरलेबाबत ग्रामपंचायत वर कारवाई करावी : सौ पूजा पाटोळे
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं दलित वस्तीमध्ये जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाचा निधी न वापरता, अन्य ठिकाणी वापरलेबाबत सदर ग्रामपंचायतीवर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी, जनसुराज्य शक्ती च्या कोल्हापूर (अनु.जाती-जमाती ) च्या जिल्हाध्यक्षा सौ. पूजा पाटोळे यांनी प्रसिधीपत्रकाद्वारे, व शंकर कांबळे यांच्यामार्फत पत्रकार परिषदेत केली आहे.
डोणोली ता.शाहुवाडी इथं हि पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी शंकर कांबळे पुढे म्हणाले कि, जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने दलित वस्ती सुधार योजनेसाठी रस्ते व गटार मिळून १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी ठराव केलेल्या समजुतीच्या नकाशात केवळ बेंद्रे गल्ली व मुथूटकर गल्ली एवढीच दलित घरे असून, बाकी एक सोसायटी व प्रार्थनास्थळ आहे. सदर गल्लीच्या रस्त्याच्या बांधकामासाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.
परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता, मुख्य दलित वस्तीत रस्त्यांची व गटारांची दुर्दशा झाली आहे. दरम्यान १२ लाख रुपये रस्त्यांसाठी व ४ लाख रुपये गटारे यासाठी मंजूर झाला असून, तो खरोखरच दलित वस्ती मध्ये त्याचा वापर झाला आहे का? व तशा आशयाचा ठराव आहे का? याची चौकशी जिल्हापरिषदेच्या वतीने करण्यात यावी. तसेच जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी १६ लाख रुपयांचा निधी वापरण्यात आला, त्याठिकाणी दलित वस्ती आहे का ? याची पाहणी करावी. सदर कामाचे बाबतीत जिल्हापरिषदेच्यावतीने चौकशी करून या कारभारास जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा जिल्ह्यातील दलित महिला रस्त्यावर उतरतील, असा इशारा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने (अनु.-जात-जमाती ) महिला जिल्हाध्यक्षा सौ. पूजा पाटोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत बांबवडे गावचे सरपंच सागर कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, दलित वस्ती सुधार योजनेसाठी आलेला निधी अद्याप वापरला गेलेला नसून, तो फक्त दलित वस्ती सुधार योजनेसाठीच वापरला जाईल. मी जनमानसातून निवडून आलेलो दलित समाजातील सरपंच आहे. तेंव्हा माझ्या दलित बांधवांवर कोणताही अन्याय होईल, असा निर्णय घेणार नाही.
यावेळी दिलेल्या निवेदनावर सौ. चांदणी सातपुते, शंकर कांबळे, सौ.पूजा पाटोळे यांच्या सह्या आहेत.