दलित समाज व स्त्री शक्ती साठी असणारे कायद्यांची प्रभावीपणे अमलबजावणी करावी – भारतीय दलित महासंघ
बांबवडे प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा देशात दिवसेंदिवस दलित समाज व स्त्री शक्तीवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. स्त्रियांच्या व दलित समाजाच्या सुरक्षेसाठी असणारे कायदे हे प्रभावीपणे राबविले जात नाहीत. याच्या निषेधार्थ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तसेच याबाबत राज्यशासन, व केंद्र शासन यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. महिलांच्या व दलित समाजाच्या सुरक्षेसाठी असणारे कायदे प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी देखील इथं निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना दिले आहे.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दलित समाजावर व स्त्री शक्तीवर देशभर होणारे अन्याय व अत्याचार यांच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

देशात मानवतेला काळिमा फासणाऱ्या निंदनीय घटना घडत आहेत. राजस्थान मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याने पाण्याच्या माठाला हात लावल्याने शिक्षकाद्वारे त्याची हत्या करण्यात आली. महाराष्ट्रात आंतरजातीय प्रेमात मुलीला विष देवून ठार मारण्यात आले. मध्यप्रदेशात घोड्यावरून वरात काढणाऱ्या युवकाला बहिष्कृत करून बेदम मारहाण करण्यात आली. गुजरात मध्ये मेलेली गाय न उचलल्यामुळे युवकांना भर चौकात नग्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्तर प्रदेश मध्ये दररोज राजरोसपणे दलित महिलांवर सामुहिक बलात्कार होत असून, दलितांची घरे पेटविली जात आहेत. उत्तरखंड मध्ये महागडे घड्याळ घातले म्हणून युवकाचे हात तोडण्यात आले. अशा विविध घटनांद्वारे दलितांना व स्त्रियांना गुलाम करणेचे षड्यंत्र आहे. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

म्हणूनच दलितांच्या व स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी , अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी विकास समुद्रे, आदिनाथ रणभिसे, किरण पाटील, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, शिवानंद कांबळे, अमर कांबळे, मानसिंग आडके, प्रदीप माने, अभिषेक गोसावी आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.