दुध उत्पादकांच्या मालकीचा संघ उत्पाद्कांकडेच राहवा,हि भूमिका – नाम. सतेज उर्फ बंटी पाटील
बांबवडे : सर्व सामान्य दुध उत्पादकांचा गोकुळ दुध संघ त्यांच्यासाठी राखून ठेवायचा कि, खाजगी माणसाच्या घशात घालायचा ,असा प्रश्न निर्माण होताच तो दुध संस्थांसाठी राखून ठेवला पाहिजे, कारण त्यावर खऱ्या अर्थाने दुध उत्पादकांची मालकी आहे. म्हणूनच आम्ही दुध संघ मल्टीस्टेट करण्यासाठी विरोध केला. आणि दुध संघ वाचला, असे परखड मत गोकुळ दुध संघाच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी चे वरिष्ठ नेते व राज्याचे गृह मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बांबवडे जवळील एका हॉल मध्ये ठराव धारकांसमोर बोलताना व्यक्त केले.
येथील राधाकृष्ण हॉल मध्ये ठराव धारकांचा मेळावा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील ठराव धारक व नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून सतेज उर्फ बंटी पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, मल्टी स्टेट दुध संघ करण्याला विरोध केल्यामुळे दुध संघ वाचला आहे. हा विरोध केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक विकासाचं साधन असलेला गोकुळ दुध संघ हा शेतकऱ्यासाठी शिल्लक राहायला पाहिजे, हीच आमची मुळची भूमिका आहे. म्हणूनच शेतकरी आमच्याकडे आहे, आणि सत्ताधाऱ्यांकडे व्यापारी आहेत. शाहुवाडी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने दुध संस्था निर्माण करण्याचे काम स्व. आनंदराव पाटील भेडसगावकर व स्व. आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांच्या माध्यमातूनच झाले आहे. आज स्व.आमदार संजयदादा यांचे चिरंजीव कर्णसिंह गायकवाड ( बाळ ) यांची उमेदवारी आपल्या आघाडीतून जाहीर केली आहे. आणि तुम्ही सर्व ठराव धारकांनी कर्णसिंह गायकवाडांवर यावेळी गुलाल उधळलाच पाहिजे, हि काळाची गरज आहे. दरम्यान शंकर पाटील शिवारे, डॉ.मीराताई पाटील, वसंत पाटील ओकोली यांनी कर्णसिंह गायकवाड यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार देखील नेत्यांनी मानले. इथून मागील मतभेद विसरून या आघाडीला कपबशी चिन्हावर शिक्का मारून आमच्या या आघाडीला निवडून द्यावे, असे आवाहन देखील मंत्री पाटील यांनी केले.
यावेळी मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले कि, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या मालकीचा असलेला दुध संघ मिळवण्यासाठी टोकाचा संघर्ष सुरु आहे. समाजात दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आर्थिक विकासाचे पर्व आजतागायत सुरु आहे. पण काही मंडळी याचे खाजगीकरण करण्याचे वेगळे प्रयत्न करीत आहेत. तालुक्यातील लबाड नेते आमच्या या शाहू शेतकरी आघाडीत आले होते. आणि काय झाले माहित नाही, ते लगेच परत सुद्धा फिरले. त्यामुळे ते आले कशासाठी आणि गेले कशासाठी हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना पडला आहे. हेच लबाड नेते आमच्या आघाडीतील एका वरिष्ठ संचालकांना, आपल्या आईंना मतदान करण्याची विनंती फोन वरून करीत होते. यावरून त्यांची निष्ठा कुठे आहे ते कळते. संचालकांनी नकार दिला हा भाग वेगळा, पण ह्या मंडळींना शेतकऱ्यांच्या भल्याची चिंता नाही. म्हणूनच या मंडळींना ४ मे रोजी होणाऱ्या निकालाचे स्वप्न अगोदरच पडले असावे. संजयदादांचे चिरंजीव कर्णसिंह यांना सन्मान देण्यासाठी येथील ठराव धारक निश्चितच सहकार्य करतील यात शंका नाही , असेहि आमदार डॉ कोरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना राजर्षी शाहू शेतकरी आघाडी चे उमेदवार कर्णसिंह गायकवाड म्हणाले कि, विरोधक अफवांचे पिक पसरवत आहेत. अशा अफवांवर विश्वास न ठेवता, आपल्या आघाडीला सहकार्य करावे. कारण शेतकऱ्यांच्या आणि दुध उत्पादकांच्या हिताचे निर्णय या आघाडीनुसारच घेतले जातील. दुध संघ दुध उत्पादकांकडेच राहिला पाहिजे. त्यांचे खाजगीकरण होवू नये, यासाठी मल्टी स्टेट ला विरोध करणे गरजेचे आहे. अन्यथा इतर राज्यातील सभासद वाढवून, हा दुध संघ घशात घातला जाईल. यासाठीच हा संघ येथील दुध उत्पादकांकडेच राहिला पाहिजे, म्हणून माझ्यासहित या आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे , हे आपले कर्तव्य आहे. आणि दादांचे हे स्वप्न होते. म्हणूनच या आघाडीला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन कर्णसिंह यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाहुवाडी पंचायत समितीचे माजी सभपती पंडितराव नलवडे यांनी केले.
यावेळी जिल्ह्याचे माजी बांधकाम आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील उर्फ आबाजी, पन्हाळ्याचे उमेदवार अमरसिंह पाटील भाऊ यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी आघाडीचे उमेदवारांनी उभे राहून ठराव धारकांना अभिवादन केले.
यावेळी मंचकावर माजी आमदार संजीवानिदेवी गायकवाड यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार महादेवराव श्रीपती पाटील यांनी मानले.