दोन जखमी वाघांच्या अस्तित्वाची निर्णायक लढत
सरूड प्रतिनिधी ( उदय कोकणे ) : इचलकरंजी लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान झाले असून, या निवडणुकीसाठी एकूण 21 उमेदवार उभे होते. त्यापैकी खरी लढत तिघांच्या मध्येच आहे. या निवडणुकीत शिरोळ व शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले. सध्या मतदारसंघात चौकात चौकात व पारावर, सोशल मीडियाद्वारेआपला उमेदवार निवडून येणार याची गणिते व दावे-प्रतिदावे मांडले जात आहेत. राजकीय वातावरणात निवडणुकीचा ‘ फिव्हर ‘ अजून टिकून आहे .
कट्टया-कट्ट्यावर आमचाच उमेदवार निवडून येणार, यावर पैजा लागल्या असून, कोणत्या भागात कोणाला मताधिक्य मिळणार याची चर्चा रंगत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार धैयशील माने यांच्याविरोधात
एक माजी खासदार तर दुसरा माजी आमदार निवडणूक लढवित असून, या दोन जखमी वाघांच्या अस्तित्वाची निर्णायक लढत होत असून, यात शिकारी कोण आणि शिकार कुणाची होणार ? हे चार जूनला स्पष्ट होईल.
२०१९ च्या मागील लोकसभा निवडणुकीत खासदार धैयशील माने यांना ५,८५,७७६ तर राजू शेट्टी यांना ४,८९,७३७ इतके मतदान झाले . धैयशील माने हे ९६,०३९ इतक्या मताधिक्याने विजयी झाले . वंचितचे उमेदवार अस्लम शेख यांना १,२३,४१९ मते पडली होती.
शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदार संघातून जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे तर शिवसेनेकडून सत्यजीत पाटील यांच्यात चुरशीची लढत होऊन, यामध्ये विनय कोरे यांनी २७८६३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. विनय कोरे यांना १,२४,८६३ तर सत्यजित पाटील यांना ९७,००५ इतकी मते पडली होती. .
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडी च्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती, तर खासदार धैयशील माने यांनी शिवसेना भाजप युती कडून निवडणूक लढविली होती . खासदार धैयशील माने यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून, राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का दिला .
मागील अडीच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथा पालथ झाली . खासदार धैयशील माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून, एकनाथ शिंदे गटात डेरे दाखल झाले. आणि पुन्हा एकदा या मतदार संघात अस्थिरता निर्माण झाली. वीस एकवीस दिवसात सेनेच्या ताकदीवर धैयशील माने यांनी खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली. निवडणूकीची घोषणा झाली, आणि या मतदारसंघात दुरंगी लढत होईल असे वाटत असताना, उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहीर करून, निवडणुकीत चुरस निर्माण केली . श्री.सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर करून दोन आजी – माजी खासदारांची हवाच काढून घेतली .
काल परवापर्यंत एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारे राजकारणातील मित्र या निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले .
मागील लोकसभा निवडणुकीत धैयशील माने यांना इचलकरंजी व शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यांमध्ये मोठे मताधिक्य देऊन तारले . मात्र यावेळची परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते . स्थानिक उमेदवार असल्याने शाहूवाडीत सत्यजित पाटील आघाडी घेतील, तर राजू शेट्टी शिरोळ मध्ये आपलं वर्चस्व दाखवितील . धैर्यशील माने यांची भिस्त हातकणंगले मतदारसघावर अवलंबून आहे . या मतदार संघात वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा सुरू आहे . वाळवा मतदारसघात आतापासूनच महायूतीमध्ये कलगी तुरा पाहायला मिळत आहे
सत्यजित पाटील यांना तर आमदारकी, गोकूळ, बाजार समिती या ठिकाणी पराभवास सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यांच्यात मरगळ आली आहे . तर राजू शेट्टींना मागील निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने ते या निवडणूकीत पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत
ही निवडणुक दोन जखमी वाघांच्या अस्तित्वाची निर्णायक लढत ठरणार आहे
असा ही योगा योग – चार हा आकडा शुभसंकेत
सत्यजित पाटील यांनी २००४, २०१४ मध्ये विधानसभेत एंट्री केली तर राजू शेट्टी यांनी २००९ व २०१४ मध्ये संसदेत प्रवेश केला . २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार आकडा नेमका कुणाला शुभ ठरेल हे चार जूनला कळेल