धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा- सकल धनगर समाज शाहुवाडी
शाहुवाडी प्रतिनिधी : सकल धनगर समाज शाहुवाडी यांच्यावतीने धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचे( S. T.) आरक्षण आणि विविध मागण्या यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्यासाठी देण्यात आले. सदर चे निवेदन कार्यालयाचे श्री कोळी यांनी स्वीकारले.
सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, धनगर समाजाला गेली ७३ वर्षे अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. संविधानात आरक्षणाच्या अंमलबजावणीची तरतूद असतानाही, सर्वच राजकीय पक्षांनी आतापर्यंत हि मागणी रोखून धरली आहे. तरी राज्य शासन व केंद्र शासन यांनी, याची त्वरित अंमलबजावणी करून, तशा आशयाचे प्रमाणपत्र द्यावे. या आरक्षणा नंतरच भरती करण्यात यावी.

याचबरोबर मेंढपाळांवर होणाऱ्या सतत च्या हल्ल्यांचा बंदोबस्त व्हावा.
धनगर समाजासाठी एक हजार कोटींच्या तरतुदीची अंमलबजावणी करावी, तसेच धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ मिळावा.
सदरचे आंदोलन प्रथम बांबवडे येथील पोलीस चौकीच्या समोर करण्यात आले. यावेळी धनगर समाजाच्यावतीने घोषणा देण्यात आल्या. सदरच्या आंदोलनाचा शासनाने गांभीर्याने विचार करून आरक्षणाच्या मागणी ची त्वरित अंमलबजावणी करावी,आणि धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी हि या निवेदनात करण्यात आली आहे.

सदरच्या निवेदनावर शाहुवाडी तालुका अध्यक्ष धनाजी बंडगर, उपाध्यक्ष कृष्णात हराळे, युवाध्यक्ष अरुण वग्रे, युवा उपाध्यक्ष धनाजी बंडगर, बबन येडगे, मोहन पाटील, सुरेश बंडगर, सुरज बंडगर, सोमनाथ बंडगर, प्रकाश वग्रे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.