धनाजी सराटे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना अटक
शाहुवाडी : शाहुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक धनाजी हरी सराटे ( वय ४५ वर्षे ) यास लाचलुचपतविरोधी खात्याने वीस हजार रुपये लाच घेताना, रंगेहाथ पकडले आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. परंतु त्याचबरोबर काहीजणांकडून समाधान सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. कारण धनाजी हे तीन वर्षाहून अधिक काळ शाहुवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव तालुका शाहुवाडी येथील पांडुरंग कोकरे व झोलू कोकरे यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यातून मारामारी होवून, पोलीस ठाण्यात परस्परांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मदत करतो, असे तपासी पोलीस नाईक धनाजी याने प्रत्येकी पाच हजार, असे तीस हजार रुपयांची मागणी केली. याबाबत ची माहिती तक्रारदार चंद्रकांत बोडेकर व जयराम कस्तुरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिली. त्यानुसार सापळा रचून धनाजी सराटे यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस हेड कॉंस्टेबल मनोज खोत, पोलीस नाईक विकास माने, नवनाथ कदम, व पोलीस कॉंस्टेबल मयूर देसाई या पथकाने हि कारवाई केली आहे.