नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, तरच ‘ कोरोना ‘ ला आळा – श्री अनिलकुमार वाघमारे
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील माण आरोग्यवर्धिनी केंद्र इथं २२ बेड उपलब्ध असून, तिथे कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर तालुक्यातील विविध ठिकाणी लसीकरण सुद्धा तत्परतेने करण्यात येत आहे. तालुक्यात रुग्णांची अवस्था नियंत्रित आहे. परंतु नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्याशिवाय आपण कोरोना ला आळा घालू शकणार नाही. यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन शाहुवाडी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री अनिलकुमार वाघमारे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

यावेळी येणाऱ्या कोरोना परिस्थिती बाबत बोलताना श्री वाघमारे म्हणाले कि, तालुक्यात येवू पाहणाऱ्या कोरोना पॉझीटीव्ह च्या रुग्णांबाबत व्यवस्था करण्यात येत आहे. करंजोशी येथील अल्फोन्सा स्कूल मध्ये सुमारे १०० बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचबरोबर प्रत्येक गावात एक नोडल ऑफिसर नेमण्यात आले असून, ते त्या गावात निष्पन्न होणाऱ्या रुग्णांबाबत बारीक लक्ष ठेवून असतील. रुग्णांची संख्या अधिक वाढल्यास घरात विलगीकरण हा एक पर्याय आहे, पण याबाबत त्यांच्या घरातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. यानंतर रुग्णांची संख्या अधिक वाढली तर, या अगोदर केलेल्या शाळेतील किंवा जागा असेल, तिथे विलगीकरण करण्यात येईल.

सध्या तरी तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात असून , वेळोवेळी तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून, निर्णय घेण्यात येईल, असेही श्री अनिलकुमार वाघमारे यांनी सांगितले.