पत्रकारांसाठी सुरक्षा कवच (विमा )देवून गौरव : आमदार मानसिंग भाऊ नाईक
शिराळा : पत्रकार हा समाजातील असा घटक आहे, जो ऊन,वारा, पावसाची तमा न करता, बातमीसाठी सतत फिरत असतो. पण या पत्रकारांच्या आरोग्याची जबाबदारी मात्र कोणीही घेत नाही, पण विश्वास उद्योग समूहाने या पत्रकारांसाठी दोन लाख रुपयांचे सुरक्षा कवच अपघाती विमा देवून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. असे मत शिराळा मतदारसंघाचे राष्ट्रवादी चे आमदार मानसिंग भाऊ नाईक यांनी व्यक्त केले.

६ जानेवारी पत्रकार दिन. यादिवशी गेले २० वर्षांपासून शाहुवाडी,शिराळा व वाळवा तालुक्यातील पत्रकारांना विश्वास उद्योग समूहाच्या वतीने गौरविण्यात येते. याप्रसंगी आमदार मानसिंग भाऊ नाईक बोलत होते.

भाटशिरगाव तालुका शिराळा इथं विश्वास व विराज उद्योग समूहाच्या वतीने पत्रकारांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वास कारखान्याचे सचिव सचिन पाटील, विविध पत्रकार संघ व संघटनांचे अध्यक्ष सर्वश्री मुकुंद पवार (शाहुवाडी ), विजय पाटील (शिराळा ), बाजीराव घोडे (कोकरूड ), अभिजित जाधव (इस्लामपूर ), यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन पाटील (शिराळा ), विकास शहा (शिराळा ), पोपट पाटील (इस्लामपूर ), नारायण घोडे (कोकरूड ), रियाज मुल्ला (पेठ ), आदी मान्यवरांचा आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिराळा, शाहुवाडी व वाळवा तालुक्यातील पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसिद्धी अधिकारी संतोष (दादा ) भालेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. एम. आर. पाटील, हिम्मत पाटील, विजय थोरबोले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.