परळे निनाई मध्यम प्रकल्प जवळ वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी ठार
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील परळे निनाई मध्यम प्रकल्प जवळ वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला वाघाने केला असल्याची चर्चा ग्रामास्थातून होत आहे. तसेच हा हल्ला होवून सुमारे दोन दिवस झाले असावेत, अशी चर्चा सुद्धा ऐकावयास मिळत आहे.
यावेळी वन्य प्राण्यांना इजा होताच ग्रामस्थांवर वनाधिकारी कारवाई करतात, तर वन्य प्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यात अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ,अशी मागणी सुद्धा जनमानसातून होत आहे.
याठिकाणी माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि, वन खाते नागरिकांची सुरक्षा करण्यात कमी पडत असून, आम्हाला आता स्वसंरक्षणार्थ हातात हत्यारे घ्यावी लागणार आहेत. यासाठी वनखात्यावर बंदूक मोर्चा काढावा लागणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या, तसेच मृत पावलेल्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई सुद्धा मिळावी, तसेच वन खात्याने वन्य प्राणी गावात येवू नयेत, यासाठी तारेचे कुंपण करून घ्यावेत, अशी सुद्धा मागणी केली होती. परंतु त्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे बंदूक मोर्चा वन खात्यावर काढावा लागेल,तेंव्हाच वन खात्याचे लक्ष या गंभीर बाबीकडे जाईल.
दरम्यान वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात रखुबाई नीनु कंक वय (६५ वर्षे ), व नीनु यशवंत कंक (वय ६९ वर्षे ) या दोघांचाही मृत्यू झाला आहे. यावेळी सुरेश नीनु कंक उपस्थित होते. दरम्यान रखुबाई यांचा डावा हात व पाय खाण्यात आला आहे. तर नीनु कंक यांचा मृतदेह तलावाच्या पाण्यात पालथा पडल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
दरम्यान भाजप चे आबासाहेब पाटील म्हणाले कि, या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिक बळी जात आहेत. याची जबाबदारी वन खात्याने घ्यावी. दरम्यान या संदर्भात वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक लावण्यात आली होती. परंतु काही मंडळींनी यामध्ये खोडा टाकून हि बैठक होवू दिली नाही. असेही श्री आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
दरम्यान शाहुवाडी वनक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांच्याशी संपर्क साधला असता, दोन्ही मृतदेहांचे शव विच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय या विषयावर आम्ही काही बोलू शकत नाही.
दरम्यान यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, आबासाहेब पाटील, या लोकप्रतिनिधींसह बापू नवाळे, सुभाषराव इनामदार, संजय खोत, यांच्यासह पोलीस निरीक्षक विजय घेर्डे व ग्रामस्थ उपस्थित होते.