पांडुरंगाच्या भेटीला वारकरी आसुसला…
बांबवडे : आज आषाढी एकादशी . अवघ्या महाराष्ट्रातील जनता पांडुरंगाच्या भेटीला आसुसली आहे. त्यातल्या त्यात वारकरी सांप्रदायाची ‘ आषाढी एकादशी ‘ म्हणजे एक पर्वणी च म्हणावयास हरकत नाही. पण कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना पंढरपुरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या मठांची आणि उपस्थितीची जागा पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तिथे संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे वारकरी पांडुरंगाच्या भेटीस आसुसला जरी असला, तरी या एकादशी च्या सोहळ्याला हि अपूर्व भेट होणार नाही.

चंद्रभागेच्या कुशीत क्षणभर विसावा घ्यायला सुद्धा, या पंढरीच्या वारकऱ्यांना मिळणार नाही. माय चंद्रभागा सुद्धा आपल्या लेकारांशिवाय अश्रू ढाळीत असेल. ‘ नको देवराया अंत आता पाहू ‘ , असेच वारकरी सांप्रदायाला वाटत असेल.

पण खंडित झालेली वारी पंढरीचा विठूराया पुन्हा एकदा सुरु करेल, अशी खात्री मात्र पांडुरंगाच्या प्रत्येक भक्ताला आहे, याबाबत दुमत नाही. आणि एक दिवस ‘ अवघे गर्जे पंढरपूर ‘ , हा वैष्णवांचा मेळा पुन्हा एकदा चंद्रभागेच्या तीरी भरल्याशिवाय राहणार नाही.
पांडुरंग हरी ,वासुदेव हरी ,रामकृष्ण हरी…..