पालेश्वर धरणाच्या सुरक्षा भिंतीलाच सुरक्षेची गरज – मनसेचे जयसिंग पाटील
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर लघुपाटबंधारे तलावाच्या सुरक्षा भिंतीलाच सुरक्षेची गरज भासू लागली आहे. अन्यथा या धरणाच्या लाभक्षेत्रातील गावे धोक्यात येवू शकतात. याची त्वरित दुरुस्ती व्हावी,अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड चे जिल्हा चिटणीस व कोळगाव तालुका शाहुवाडी चे सुपुत्र श्री जयसिंग पाटील यांनी एसपीएस न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी ते पुढे म्हणाले कि, स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांनी आपल्या मंत्रीपदाची आहुती देवून, हे लघुपाटबंधारे तलाव तालुक्यासाठी मंजूर करून आणले आहेत. यामुळे येथील शेतकरी समाधानी झाला असून, शेती च्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी ची हि भटकंती थांबली. परंतु सध्या पालेश्वर येथील लघुपाटबंधारे तलावाची सुरक्षा भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. भविष्यात हि भिंत पावसामुळे वाहून गेल्यास ,तसेच निकृष्ट बांधकामामुळे फुटल्यास, याची किमत या धरणाच्या खालच्या बाजूस असलेली गावे,तेथील जनता यांना बसणार आहे..

यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून ह्या भिंतीचे काम व्यवस्थित करून घ्यावे. अन्यथा ग्रामस्थांच्या जीवितास धोका आहे. हि भिंत गेल्या पावसाळ्यात कोसळली होती. त्यानंतर त्या भिंतीची डागडुजी करण्यात आली , परंतु ती निकृष्ट दर्जाची असल्याने पुन्हा ह्या भिंतीचा भाग कोसळत आहे. येत्या पावसाळ्यात या भिंतीचे बांधकाम वाहून गेल्यास मोठी जीवित हानी व शेतीचे नुकसान होवू शकते. तसेच पालेश्वर धरणातून उगम पावलेल्या शाळी नदीकाठच्या ठाणेवाडी, माण , परळे, उचत, कोळगाव, मलकापूर, कोपार्डे अशा बऱ्याच गावांना याचा फटका बसू शकतो.

त्यामुळे या भिंतीचे दर्जेदार बांधकाम करून घ्यावे. अन्यथा मनसे चे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर,यांच्यासहित स्थानिक कार्यकर्त्यांसहित मनसे आंदोलन करील. असेही जयसिंग पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कोळगाव चे सरपंच आनंदा कांबळे, ओंकार केसरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.